एसपी कार्यालयात विनापरवाना वाहन पार्क करणार्‍यांवर कारवाई

खासगी व्यक्ती वाहने पार्क करून जातात बाहेरगावी
एसपी कार्यालयात विनापरवाना वाहन पार्क करणार्‍यांवर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये खासगी व्यक्तीने विनापरवाना चारचाकी, दुचाकी वाहन पार्क केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर शहर वाहतुक शाखेला दिले आहेत. सोमवारी सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पथकास पाच ते सहा वाहनांवर कारवाई केली.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये येथील अधिकारी, पोलीस अंमलदार यांची चारचाकी, दुचाकी वाहने पार्क केले जातात. पोलीस अधीक्षक कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची वाहने देखील येथे पार्क केली जातात. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून खासगी व्यक्ती या पार्किंगमध्ये त्यांची वाहने पार्क करून बाहेरगावी जातात. काही व्यक्ती महिना, दोन महिने या वाहनांकडे येत नाही. यामुळे येथील पार्किंगमध्ये वाहनांची गर्दी होते. पर्यायाने येथील अधिकारी, अंमलदार यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना वाहने पार्क करताना अडचण निर्माण होते. आलेले नागरिक बेशिस्त पार्किंग करतात.

यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात कामाशिवाय आलेल्या व्यक्तीचे वाहन पार्किंगमध्ये दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक ओला यांनी नगर शहर वाहतुक शाखेला दिले आहेत. सोमवारी निरीक्षक वाघ यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार जालिंदर शिंदे, संतोष साळवे यांच्या पथकाने अशा वाहन चालकांवर कारवाई केली. काही वाहन चालकांना समज देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com