पोलीस बंदोबस्त नको म्हणणारे बेलापूर हे पहिले गाव - पाटील

पोलीस बंदोबस्त नको म्हणणारे बेलापूर हे पहिले गाव - पाटील

बेलापूर |वार्ताहर| Belapur

माझ्या 25 वर्षाच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे बेलापूर हे पहिले गाव पाहिले आहे. सण, उत्सव, जयंत्या मोठ्या उत्साहात साज़र्‍या करा. त्याचा आनंद लुटा; असे सण उत्सव साजरेे करत असताना बेलापुरकरांसारखा समाजात आदर्श निर्माण होईल असा कार्यक्रम, उपक्रम राबवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापूर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधून बेलापुरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखुन विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्ज पार पाडले, गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापूर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. सदस्य शरद नवले हे होते. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, रणजित श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ उर्फ लहानू नागले, साहेबराव वाबळे, सुधाकर खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रामेश्वर सोमाणी, बाळासाहेब दाणी, विष्णुपंत डावरे, रवींद्र कोळपकर, पोलीस पाटील अशोक प्रधान, अन्वर सय्यद, प्रभात कुर्‍हे, शफीक बागवान, जाकीर हसन शेख आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

पोलीस अधिक्षक श्री. पाटील म्हणाले की, आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते. बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला. बेलापूरच्या नेतृत्वाचे हे यश आहे. बेलापुरकरांनी राबविलेला हा बेलापुर पॅटर्न जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागू व्हावा, अशी अपेक्षाही श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असून गावाच्या विकासासाठी उज्वल भविष्यासाठी अशीच भूमिका ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सरपंच महेंद्र साळवी, प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदू संघटक वीर सावरकर मित्रमंडळ रुपये पाच हजार, द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तीन हजार तृतीय क्रमांक, गौरी गणेश बाल मित्रमंडळ रुपये दोन हजार, सिध्दी विनायक युवामंच रुपये एक हजार, रामराज्य मित्र मंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला. तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील जामा मस्जिद ट्रस्ट महावितरणचे अधिकारी कर्मचारी गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी पोहणारे बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com