प्रलंबित गुन्हे निकाली काढा, अन्यथा कठोर कारवाई

एसपींची अधिकार्‍यांना तंबी : दंडात्मक कारवाईसह पगार वाढीवर टाच
प्रलंबित गुन्हे निकाली काढा, अन्यथा कठोर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गुन्ह्यांचा तपास रखडल्यामुळे फायली वर्षानुवर्षे पोलीस ठाण्यात धूळखात पडून आहेत. लवकरात लवकर प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिले आहेत. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यात हलगर्जीपणा केल्यास संबंधित ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांसह तपासी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये संबंधित तपासी अधिकार्‍यांना जबाबदार धरून दंडात्मक कारवाई, पगार वाढीला कात्री लावण्यात येत आहे.

जिल्ह्यात 33 पोलीस ठाणे आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांचा तपास वर्षानुवर्षे रखडला आहे. यामध्ये निलंबित कर्मचार्‍यांकडील गुन्हे, जाणीवपूर्वक बाजूला ठेवलेले गुन्हे, तपासी अधिकार्‍यांची बदली झाल्यानंतर तपासी अधिकार्‍यांनी त्या गुन्ह्याचे कोणतेच काम न केलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे तक्रारदारांना न्याय देण्यामध्ये पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाणे स्थापन झाल्यापासून ते डिसेंबर 2020 पर्यंत प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांवर काम करण्याच्या सूचना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व पोलीस ठाण्यांत अधिकारी, कर्मचारी प्रलंबित गुन्ह्यांच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्यात रोज नवीन गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यात काही गुन्हे किरकोळ वादातून दाखल होतात. यामुळे एका तपासी अंमलदाराकडे अनेक गुन्ह्यांचा एकावेळी तपास असतो. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचे प्रकरण प्रलंबित राहतात. यामुळे अशा गुन्ह्यांच्या फाईली निकाली काढण्याचे काम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, गुन्ह्यांचे तपास करणारे अंमलदार यांना वरिष्ठांकडून सतत मार्गदर्शन केले जात आहे.

गुन्हा का प्रलंबित राहिला याचा जाब संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांसह तपासी अंमलदारांना विचारला जात आहे. जाणीवपूर्वक गुन्ह्याचा तपास केला नसल्यास, त्यात काही त्रुटी आढळून आल्यास वरिष्ठांकडून कठोर कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईसह त्यांच्या पगार वाढील कात्री लावली जात आहे. काहींची तर थेट नियंत्रण कक्षात बदली केली जात आहे. अशा काही अधिकारी, कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोणता गुन्हा आहे हे तपासून त्याचा तपास कोणत्या पद्धतीने झाला आहे, हे पाहिले जाते. तपास वेळेवर केला आहे का? तपास योग्य केला आहे का? हे तपासले जाते. त्यानुसार संबंधित प्रभारी अधिकारी, तपासी अंमलदारांवर कारवाई केली जात आहे. गुन्ह्यात गंभीर त्रुटी आढळून आल्यास कडक कारवाई केली जात आहे. अनेकांच्या पगार वाढीला कात्री लावली आहे. दंडात्मक कारवाईही केली जात आहे.

- मनोज पाटील (पोलीस अधीक्षक, अहमदनगर)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com