मुद्देमालांची विल्हेवाट लावल्यामुळे पोलीस ठाण्यांचे स्वरूप पालटले

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची संकल्पना || वर्षांनुवर्ष मुद्देमाल होता पडून
मुद्देमालांची विल्हेवाट लावल्यामुळे पोलीस ठाण्यांचे स्वरूप पालटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल वर्षांनुवर्ष संबंधीत पोलीस ठाण्यांच्या आवारात आणि पोलिसांच्यात ताब्यामध्ये पडून राहत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यात पडून असलेल्या विविध मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यामुळे पोलीस ठाण्यांचे स्वरूप पालटले आहे.

पोलिसांना जप्त केलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी इतर विभागांची ही महत्त्वाची भूमिका असते. मात्र, इतर विभागांशी समन्वय साधला जात नसल्यामुळे कोट्यवधी रूपयांचा मुद्देमाल पोलीस ठाण्यात आवार आणि पोलिसांच्या ताब्यात पडून राहत होता. यामध्ये जीवित, मालमत्ता, सोने - चांदी मौल्यवान धातू, वनविभाग, अंमली पदार्थ, दारू, वाहने, गौण खनिज, इंधना संबंधित गॅस, पेट्रोल, डिझेल, स्फोटक पदार्थ, सायबर क्राईमशी संबंधित असलेल्या गुन्ह्यात मोबाईल, संगणक आदींचा समावेश होता.

पोलीस अधीक्षक पाटील यांनी 10 मार्चपासून मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये एक कोटी 12 लाख सात हजार 465 रूपयाची मुद्देमालासह विल्हेवाट लावण्यात आली आहे. दोन हजार 872 वस्तूंचाही समावेश आहे. सोने-चांदीचे 107 मुद्देमाल होते. 620 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल 19 लाख 72 हजार रूपयांचा होता. रोख रक्कम संदर्भात 242 मुद्देमाल होते. सात लाख 54 हजार 351 रुपये मूळ फिर्यादीला देण्यात देण्यात आले आहेत तर पाच लाख 95 हजार 560 रूपये न्याय प्रविष्ट आहेत. 317 दुचाकीं, 67 चारचाकी मूळ मालकांकडे देण्यात आले आहे.

दारू संदर्भातील 1 हजार 519 मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. 49 लाख 78 हजार 61 रूपयांचा मुद्देमाल होता. बेवारस असलेल्या 222 वाहनांचा लिलाव करण्यात आला. मटका, जुगार आदी अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये पाच लाख 72 हजार 973 रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आले, ही रक्कम सरकार जमा केलेली आहे. मारहाण आदी संबंधित गुन्ह्यांमध्ये काट्या इतर साहित्याचा वापर केला जात असतो, असे 65 मुद्देमाल न्यायालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. अंमली पदार्थाच्या 58 गुन्हांमधील 23 लाख 34 हजार 520 रूपये किंमतीचा एक हजार 603 किलो 26 ग्रॅम गांजा आणि आफू नष्ट केला आहे.

मुद्देमाल मिळवण्यासाठी कायद्यातील तरतूद

451 या कलमानुसार एखाद्या गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात हजर केल्यानंतर तो मिळवण्यासाठी संबंधिताला न्यायालयात अर्ज करून मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करावा लागतो. त्यानंतर न्यायालय हा माल देण्याबाबत योग्य तो आदेश देतात. कलम 452 नुसार जीविताशी संबंधित असलेल्या गुन्ह्यांमध्ये खून, मारहाण करणे अशा गुन्ह्यात न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर या गुन्ह्यात वापरलेली साधने विल्हेवाट लावण्यासाठी आदेश दिला जातो किंवा एखाद्या व्यक्तीने त्या मालमत्तेवर हक्क दाखवल्यानंतर मालमत्ता देण्याची तरतूद आहे. कलम 457 नुसार एखाद्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा असल्यास संबंधित तो मुद्देमाल मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो. न्यायालय ठराविक रकमेच्या बॉण्ड वरती तो मुद्देमाल संबंधिताला देण्याबाबत आदेश करत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com