पोलीस अधीक्षक अखिलेश यांनी घेतला जामखेडच्या पोलीस वसाहतीचा आढावा
सार्वमत

पोलीस अधीक्षक अखिलेश यांनी घेतला जामखेडच्या पोलीस वसाहतीचा आढावा

Arvind Arkhade

जामखेड |तालुका प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड येथील प्रस्तावित पोलीस वसाहतीची पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पाहणी करीत पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याशी वरील विषयाबाबत चर्चा केली. लवकरच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा वसाहतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

अनेक वर्षांपासून जनतेचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जुन्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीमध्ये आपल्या परिवारासह जीव मुठीत धरून राहत आहेत. जुनी मोडलेली दरवाजे, मोडलेले अथवा कुजलेले कौलारू त्याला आधार देणारे वाकलेले खांब, परिसरात जप्त केलेला मुद्देमाल, अस्ताव्यस्त पडलेली गुन्ह्यातील वाहने, रात्रीची पुरेशी वीज-व्यवस्था नसल्याने पडलेले काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य, वाढलेले गवत आणि काटेरी झुडुपे यासह कारागृहातील घाण वाहून नेणार्‍या गटारीचा दुर्गंध अशा विविध समस्यांशी सामना करीत कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस वसाहतीमध्ये राहत आहेत.

याबाबत अनेक वेळा वृत्तपत्राच्या माध्यमातून पोलीस वसाहतीच्या प्रश्नांवर आवाज उठविला गेला. सद्यस्थितीत असलेली पोलीस वसाहतीची दुरुस्ती अथवा डागडुजी करण्यात येईल. तसेच नवीन वसाहत लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन मिळाले. मात्र कारवाई आणि अंमलबजावणी शून्यच राहिली.

नाईलाजास्तव बर्‍याच पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आपला बाडा-बिस्तरा खाजगी भाड्याच्या फ्लॅटवर अथवा बंगल्यात हलविला. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी जामखेडच्या जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. तसेच नवीन प्रस्तावित पोलीस वसाहतीमध्ये चार पोलीस अधिकारी आणि 32 पोलीस कर्मचार्‍यांच्या जागेची बारकाईने पाहणी करीत त्याची नोंद ठेवली.

याबाबत पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटिल यांच्याशी चर्चा केली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या पाहणीनंतर पोलीस वसाहतीमध्ये राहणार्‍या कर्मचार्‍याच्या कुटुंबियाना हायसे वाटले. लवकरच पोलीस वसाहतीच्या कामाबाबत सुखद बातमी कानावर ऐकायला येईल, अशी अपेक्षा लागली आहे.

यामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान, बाग, बगिचा यामध्ये असलेल्या जुन्या झाडांचे संवर्धन करणे आणि सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व बाबींचा आढावा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com