50 हजाराचे सोयबीन चोरले

कुठे घडली घटना || पोलिसांत गुन्हा
50 हजाराचे सोयबीन चोरले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोणीमध्ये भरून ठेवलेले 50 हजार रूपये किंमतीचे 14 गोणी सोयबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवारात रविवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी रविवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम जगन्नाथ झिने (वय 38 रा. पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या शेतामधील सोयबीन 14 गोण्यांमध्ये भरून घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले होते. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे फिर्यादी यांच्या घरासमोर आले. त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले 14 गोणी सोयबीन एका टेम्पोमध्ये भरले व ते चोरून नेले. फिर्यादी यांना सोयबीन चोरीची माहिती मिळताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.

अधिक तपास पोलीस नाईक आर. के. शिंदे करीत आहेत. दरम्यान नगर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पाळीव जनावरांसह शेतामधील इलेक्ट्रीक वस्तू चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता शेतकर्‍यांच्या पिकावरही चोरट्यांकडून डल्ला मारला जात आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com