सोयाबीनमधील गोगलगायींचे वेळीच नियंत्रण करा- भरत दवंगे

सोयाबीनमधील गोगलगायींचे वेळीच नियंत्रण करा- भरत दवंगे

बाभळेश्वर |वार्ताहर| Babhaleshwar

जिल्ह्यामध्ये विस्तृत क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली असून या पिकावर सध्या बर्‍याच ठिकाणी गोगलगायींचा प्रादर्भाव आढळून येत आहे. कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांचे माध्यमातून राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यात सोयाबीन पीकांच्या प्लॉटची पाहणी केली असता सध्या गोगलगायींमुळे सोयाबीनचे नुकसान होत असल्याने सोयाबीनबधील गोगलगायींचे वेळीच नियंत्रण करावे, असे आवाहन पिक संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी केले.

प्रवरा परिसरातील विविध गावामध्ये केंद्राचे शास्ञज्ञ शैलेश देशमुख, भरत दंवगे, शांताराम सोनवणे यांनी भेटी दिल्या. गोगलगायींच्या प्रादुर्भावाविषयी माहिती देतांना श्री. दवंगे यांनी सांगितले, पावसाळ्याच्या सुरूवातीला 2-3 पावसाच्या सरी पडल्यानंतर या गोगलगायींची मादी अंडी घालते आणि 5-7 दिवसांनतर ही अंडी फुटून त्यामधून गोगलगायींची छोटी पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले सोयाबीन पिकामध्ये लहान रोपांची पाने आणि देठ कुरतडून खातात. त्यामूळे सोयाबीनची झाडे मरून जातात आणि झाडांची संख्या कमी होवून याचा उत्पादनावर परिणाम होतो.

शेतामध्ये गोगलगायींचा प्रादूर्भाव दिसू लागल्याबरोबर मेटालडिहाईड या नावाचे औषध प्रती एकरी दोन किलो या प्रमाणामध्ये बांधाच्या कडेने आणि पिकामधील मोकळ्या जागेमध्ये टाकावे. हे औषध गोगलगायी आवडीने खातात आणि त्वरित मरून पडतात. याबरोबरच सोयाबीन पिकामधील मोकळ्या जागेमध्ये गवताचे ढिग किंवा रिकामी पोती ओली करून टाकावीत. या ओल्या पोत्यांखाली किंवा गवताच्या ढिगांखाली रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गोगलगायी जमा होतात. अशा प्रकारे जमा झालेल्या गोगलगायी सकाळच्या वेळी गोळा करून किटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकाव्यात.

त्याचप्रमाणे विषारी अमिषाचा वापर करुन सुध्दा गोगलगायींचे नियंत्रण करता येते. त्यासाठी 50 किलो गव्हाचा भुस्सा 200 लिटर पाण्याच्या टाकीमध्ये रात्रभर भिजत ठेवावा. त्यामध्ये 2 किलो गुळाचे पाणी टाकावे. दुसर्‍या दिवशी पहाटे 50 ग्रॅम इमामेक्टीन बेंझोएट हे किटकनाशक या भुस्स्यामध्ये मिसळावे आणि दिवस उगवण्याच्या अगोदर हा भुस्सा शेतामधील मोकळ्या जागेत ठिकाणी टाकावा. त्यावर रिकामी पोती ओली करून टाकवीत. सकाळच्या वेळी या पोत्यांच्या खाली शेकडोंच्या संख्येने गोगलगायी जमा होतात. अशा एकत्रित जमा झालेल्या गोगलगायी एकाच वेळी गोळा करून नष्ट करता येतात.

घरगुती पध्दतीने सुध्दा गोगलगायींचे नियंत्रण सहज करता येते. त्याकरिता 5 किलो मुरमुरे घेवून त्यामध्ये 50 ग्रॅम थायोडीकार्ब नावाचे किटकनाशक मिसळून हे मुरमुरे बांधाच्या कडेने आणि शेतामध्ये मोकळ्या जागेत टाकावेत. अशा पध्दतीने विषारी मुरमुरे खाल्ल्यामुळे सुध्दा गोगलगायीचे त्वरीत नियंत्रण होते. सर्व सोयाबीन उत्पादकांनी गोगलगायींच्या नियंत्रणासाठी वरीलप्रमाणे उपाय योजना करावी, असे आवाहन श्री. दवंगे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com