सोयाबीनच्या दरात घसरण

दरात वाढ होण्याच्या शक्यतेने शेतकर्‍यांनी माल रोखून धरला
सोयाबीनच्या दरात घसरण

खैरी निमगांव |वार्ताहर| Khairi Nimgav

सध्या सोयाबीनच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. मात्र शेतकरी माल रोखून धरत टप्प्याटप्प्याने बाजारात आणत असल्याने बाजारावर आवकेचा दबाव नाही. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

या हंगामात सोयाबीनची आवक सुरू झाली असताना पावसाने भिजलेल्या सोयाबीनची बाजारात प्रचंड आवक झाल्याने सोयाबीन दरावर दबाव होता. आवक सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सोयाबीन दरात साधारणपणे 14 ते 15 टक्क्यांनी घट झाली. मात्र नंतर शेतकर्‍यांनी आपला शेतमाल बाजारात नेणे बंद करून त्याची साठवणूक केली. त्यामुळे पुढील तीन आठवड्यात सोयाबीन दरात वाढ होऊन सोयाबीन 5500 ते 6000 च्या आसपास पोहचेल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सारखी घसरण होत आहे. असे असताना बाजारात सोयाबीनची आवक साधारणपणे किमान 4 ते कमाल 10 क्विंटलपर्यंत राहिल्यानेच प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे. त्यांनी आता चढ्या भावाने सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.

सोयाबीनचे क्रशिंग केल्यानंतर सोयापेंड आणि सोयातेल तयार होते. या उत्पादनांना जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत किती मागणी आहे, त्यांची दरपातळी काय आहे, यावर सोयाबीनचे दर ठरतात. सोया तेलाची पाम तेलाशी थेट स्पर्धा आहे. अशा स्थितीत पामतेलाच्या दरात वाढ झाल्यास त्याचा थेट फायदा सोयाबीनला होणार आहे. मात्र, सोयापेंड निर्यातीच्यादृष्टीने फारसा उत्साह नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. काही दिवसांपूर्वी सोयापेंडच्या दरातील पडतळ आल्यामुळे निर्यातीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी निर्यातीचा करार झाला होता. मात्र त्यानंतर निर्यातीचे करार फारसे वाढले नाहीत. त्यामुळेच सोयापेंडीच्या आघाडीवर फारसा आधार सध्या मिळत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील वाढ ही मर्यादित स्वरूपात राहील.

गेल्या आठवड्यात राहाता, श्रीरामपूर बाजारात सोयाबीनचा भाव 5700 रुपयांवरून 5500 रुपयांपर्यंत घसरला. वांबोरी, राहुरी बाजारात देखील सोयाबीन 5500 रुपयांवर आले होते. काही बाजारात तर दर 5400 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र आता या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होऊ शकते, मात्र ही वाढ विक्रमी राहणार नाही. शेतकरी हुशारीने माल रोखून ठेवत असल्याने बाजारपेठेत आवक वाढत नाही. एकूणच प्रक्रिया उद्योजकांची गोची झाली आहे. त्यांनी आता चढ्या भावाने सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल. दरम्यान हे शेतकर्‍यांच्या एकीचे बळ असून यामुळे बाजारात सोयाबीन दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com