‘महाबीज’कडून यंदा सोयाबीनला कमी दर

दर वाढवून द्या ; शेतकर्‍यांची मागणी
‘महाबीज’कडून यंदा सोयाबीनला कमी दर

पाचेगाव (वार्ताहर) - महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या ‘महाबीज’ मार्फत नेवासा तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी गेल्यावर्षी बियाणे घेवून सव्वाशे हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतले. लहरी निसर्गामुळे उत्पादन कमी आले. शेतकर्‍यांनी ही सोयाबीन बाजारभावापेक्षा अधिक दर मिळण्याच्या हेतूने ‘महाबीज’ला बियाणासाठी दिली. मात्र महाबीजने बाजारभावापेक्षा अधिक दर तर दिला नाहीच उलट क्विंटलला अडीच ते तीन हजार रुपये कमी दर दिल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, यावर्षी खाद्यतेलाच्या टंचाईमुळे सोयाबीनचे दर क्विंटलला साडेसात ते आठ हजार रुपये होते. पण महाबीजने मात्र प्रति क्विंटल पाच हजार दोनशे रुपये इतकाच शेतकर्‍यांना भाव दिला. म्हणजे जवळपास प्रति क्विंटल जवळपास तीन हजार रुपये कमी भाव दिला.

त्यात महाबीज बियाण्याची जर्मिनेशन (उगवण) क्षमता तपासूनच सोयाबीन खरेदी करते. ज्या शेतकर्‍यांच्या सोयाबीनची उगवणक्षमता कमी आहे अशी सोयाबीन स्विकारली जात नाही. ज्या शेतकर्‍यांची सोयाबीन महाबीजने स्विकारली त्यांना 5 हजार 200 चा भाव मिळाला. ज्यांची उगवण क्षमते अभावी नाकारली गेली त्यांना बाजारात साडेसात ते 8 हजार रुपये भाव मिळाला.

त्यामुळे त्या शेतकर्‍यांना अर्थिक दृष्टया फायदा मिळाला. महाबीजपेक्षा शेतकर्‍यांना क्विंटल मागे तीन हजार रुपये दर जास्त मिळाल्याने मिळाल्याने ते आनंदीत आहे. पण ज्या शेतकर्‍यांच्या आर्थिक नुकसान झाले त्या शेतकर्‍यांना महाबीजने पुनर्विचार करून सोयाबीन पिकाला जास्त दर देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

आणखी दर देवून न्याय द्यावा

मी मागील 35 वर्षांपासून महाबीजचा शेअर्स धारक आहे. ‘महाबीज’ने आतापर्यंत विविध पिकांच्या वाण निर्मिती केलेल्या पिकाचे चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतले. महाबीजने आतापर्यंत शेतकर्‍यांना चांगला भाव देखील दिला आहे. पण सोयाबीन पीक दर संदर्भात यंदा मात्र अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटलला मुकावे लागले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर योग्य तो निर्णय घेऊन शेतकर्‍यांना अजून दर देऊन सहकार्य करावे व न्याय द्यावा.

- वामनराव तुवर शेतकरी संघटना कार्यकर्ते, पाचेगाव

दरविषयक समस्यांबाबत वरिष्ठांना कळवणार

आतापर्यंत महाबीजने शेतकर्‍यांच्या सोयाबीनला चांगला दर दिला आहे. याच्या अगोदर दहा वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस महाबीजने शेतकर्‍यांना बोनस पोटी म्हणून पुन्हा रक्कम अदा केली होती. त्यामुळे यावेळेस देखील वरीष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल. शेतकर्‍यांना त्याचा मोबदला देण्यात येईल. महाबीज प्रत्येक पिकाला इतरांपेक्षा चांगले दर देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या दरविषयक समस्यांबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल.

-रवींद्र जोशी जिल्हा व्यवस्थापक (महाबीज) अहमदनगर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com