सोयाबीनची उगवण क्षमता अतिशय कमी

संबंधित कंपनीविरुद्ध कार्यवाही करावी-बारहाते
सोयाबीनची उगवण क्षमता अतिशय कमी

कान्हेगाव |वार्ताहर| Kanhegav

सोयाबीन बियाणांची अतिशय कमी प्रमाणात उतरण झाल्याने कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कंपनीविरुद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी रावसाहेब भागवत बारहाते या शेतकर्‍याने कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मी सडे (ता. कोपरगाव) येथील शेतकरी असून कोपरगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून सोयाबीनच्या 4 बॅग दि. 11 मे 2022 रोजी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर सदर बियाणे मी दि. 2 जुलै 2022 रोजी माझ्या मालकीचा गट नं. 45/3 मधील क्षेत्र 1 हे. 49 आर या क्षेत्रामध्ये पेरणी केली. सदर बियाणे 30 ते 35 टक्के प्रमाणात उतरले असे दिसत आहे. सदर पेरणी मी योग्य वेळेत केली आहे.

तरीसुध्दा बियाणाचा उतारा झालेला नाही. त्यामुळे यावर्षीचे माझ्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आपण लवकरात लवकर पाहणी केली तर मला पुन्हा दुबार पेरणी करता येईल. मला योग्य तो न्याय द्यावा व मला नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती संबंधित अधिकार्‍यांना केली आहे. दरम्यान सदर बियाणे कंपनीस संपर्क केला असता दोन दिवस थांबा, असे उत्तर मिळाल्याचे रावासाहेब बारहाते यांनी सांगितले.

सोयाबीन पेरणी करून तेरा दिवस झाले तरी उगवण फक्त 30 ते 35 टक्के झाली आहे. चार बॅग पैकी तीनच बॅग पेरल्या आहेत. पेरणीच्यावेळी बॅग उघडल्या तेव्हा बी हिरवे व खराब दिसत होते. याबाबत दुकानदार यांना सांगितले होते. परंतु त्यांनी माझ्या भरवशावर पेरणी करा, असे सांगितले. यातील एक बॅग माझ्याकडे शिल्लक आहे. आता दुकानदार बॅगवरील टोल फ्री क्रमांकावर फोन करा, असे सांगत आहे. मला न्याय न मिळाल्यास ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.

- रावसाहेब बारहाते, शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com