शेतकर्‍यांच्या होल्डींगमुळे दिवाळीत सोयाबीन भाववाढ दिलासादायक

शेतकर्‍यांच्या होल्डींगमुळे दिवाळीत सोयाबीन भाववाढ दिलासादायक
सोयाबीन

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

दिवाळी साजरी करण्यासाठी सोयाबीन निघाल्यावर शेतकर्‍यांमधून सोयाबीन विक्रीचा कल असतो. त्यामुळे दरवर्षी दिवाळीला आवक वाढल्याने बाजार पडतात. मात्र चालू वर्षी वेगळेच चित्र आहे. चार दिवस अडचणीत जातील पण सोयाबीनला भाव चांगला आल्यावरच विकायची या धोरणामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन होल्ड केली. परिणामी यावर्षी दिवाळीत बाजार कोसळण्याऐवजी वाढल्याचे प्रथमच दिलासादायक चित्र आहे.

शेतकर्‍यांना रोखचोक पैसे देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. सोयाबीनची काढणीही नेमकी दिवाळीच्या तोंडावर होते. सोयाबीन विकून दिवाळीची खरेदी केली जाते. वर्षाचा सण असल्याने उत्साहात साजरा करण्यासाठी निघालेले सोयाबीनचे पीक मिळेल त्या भावात शेतकर्‍यांकडून विकले जाते. त्यामुळे दरवर्षी ऐन दिवाळीत सोयाबीन सह इतर शेतमालाचे बाजार पडतात.

गेल्या वर्षी तर दिवाळीला आवक वाढल्याने हमी भावापेक्षा कमी भावात म्हणजेच 3 हजार 500 ते 3 हजार 700 पर्यंत सोयाबीनची खरेदी सुरु होती. दिवाळीनंतर जानेवारीपासून सोयाबीनचे भाव वाढण्यास सुरूवात झाली. अगदी क्विंटलला दहा हजाराच्या पुढे भावाचा पल्ला सोयाबीनने गाठला. मात्र त्यावेळी बहुतांश सोयाबीन व्यापारी व तेल कंपन्यानी खरेदी केली होती. फार थोडक्या शेतकर्‍यांना वाढीव दराचा फायदा झाला.

गेल्या वर्षाचा अनुभव पाहता चालू वर्षी शेतकर्‍यांनी दिवाळी काटकसरीत करू मात्र सोयाबीन विकण्यात घाई नको ही भूमिका घेतल्याने बाजारातील आवक अत्यंत कमी झाल्याने ऐन दिवाळीत पडणारे सोयाबीनचे भाव चालू वर्षी प्रथमच वाढल्याचे चित्र आहे. अगदी हमी भावापेक्षा दीड हजारांनी सोयाबीनला जास्त दर मिळत आहेत. शेतकर्‍यांनी भाव आल्याशिवाय सोयाबीन विकायची नाही हीच भूमिका ठेवल्यास येत्या काळात दर आणखी वाढण्याचे चिन्ह आहे. बळीराजाने शेतीमालाच्या भाववाढीसाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज नसून त्यांनी एकी केल्यास बाजाराचा अंदाज घेऊन शेतमालाची नियोजित विक्री केल्यास शेतकर्‍यांच्या कष्टाचे चिज होऊ शकते असेच दिलासादायक चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com