
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
मोजाक या रोगामुळे सोयाबीन पिकाचे दाणे भरण्याअगोदरच वाळून गेल्यामुळे शेतकर्याचे नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या सोयाबीन पीकाचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपा तालुका उपाध्यक्ष व मुठेवाडगाव सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन डॉ. शंकरराव मुठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आधीच दोन वर्षे करोनामुळे शेतीच्या पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. यावर्षी चांगला पाऊस पडून शेतकर्याला वाटले होते की, सोयाबीनचे दोन पैसे हातात पडतील. परंतु मोझॅक रोगामुळे सोयाबीन पीक वाया गेले. मशागत, पेरणी बी बियाणे, रासायनिक खते यापेक्षा किटकनाशके फवारणीस सर्वाधिक खर्च झाला आहे. या सर्व खर्चाने शेतकर्याचे कंबरडे मोडून हतबल झाला आहे.
पुढील रब्बी हंगामातील मशागती कशा करायच्या. करोनामुळे दोन वर्ष दिवाळी साजरी केली नाही. यावर्षी शेतकर्यांनी मुलाबाळांची लेकीची दिवाळी कशी साजरी करायची. नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना दिवाळीपूर्वी भरपाई द्यावी, असे निवेदनात मुठे यांनी म्हटले आहे.