'यलो मोझाईक'च्या हल्ल्यामुळे सोयाबीन संकटात

'यलो मोझाईक'च्या हल्ल्यामुळे सोयाबीन संकटात

कोल्हार | वार्ताहर

कोल्हार भगवतीपूर येथील खर्डे-कडसकर वस्ती शिवारात तसेच तिसगाव प्रवरा, राजुरी, तांबेवाडी, ममदापूर या गावातील काही भागांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझाईक या विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काही शेतकऱ्यांना उभ्या पिकाची नांगरट करावी लागली. सोयाबीन पिवळे पडून सुकल्याने शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला. यासंदर्भात तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

दोन वर्षापासून सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने खरिपातील मुख्य पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढला. परिणामी यंदाच्या खरिपात सोयाबीनची भरपूर पेरणी होऊन क्षेत्र वाढले. बहुतांश शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी संशोधित केलेले केडीएस ७२६ फुले संगम या वाणाला पसंती दिली. मात्र यलो मोझाईक या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव या जातीच्या सोयाबीनवर दिसून येऊ लागल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

दोन अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये जतन केलेले सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत हातचे जाऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. याकाळात नांगरट, रोटावेटर, बियाणे पेरणी, तणनाशक, खुरपणी, बुरशीनाशक, कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्ये आदि बाबींवर झालेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.

ज्याठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, तेथे शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकून गेली. त्यामुळे सोयाबीनच्या उभ्या पिकाची नांगरट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. संपूर्ण खरीप वाया गेला. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सोयाबीनचा पैसा हाती येईल ही शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी हवालदिल झाले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले संगम या बियाणाच्या बाबतीत आणखी संशोधन करून सुधारणा करावी तसेच कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त सोयाबीनच्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोल्हार भगवतीपुर येथील ज्ञानेश्वर खर्डे, नितीन खर्डे, सोमनाथ खर्डे, अनिरुद्ध खर्डे, प्रभाकर खर्डे, दिगंबर खर्डे, आण्णासाहेब खर्डे, सौरभ कडसकर, नानासाहेब कडसकर, मयूर कडसकर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com