
पिंपरी निर्मळ | वार्ताहर
मे महिना मध्यावर आला असुन शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. मात्र गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांचे पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे दर १ हजार २०० रुपयांनी कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यातच वाढलेले डीझेलचे भाव यामुळे पेरणीपूर्व मशागतही महागली आहे.
बहुंताशी पावसावर व चार महीन्यात येणारे नगदी पिक म्हणुन सोयाबीन पिकाकडे पाहीले जाते. सोयाबीनला गेल्या तीन वर्षांपासून बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने शेतकर्यांचा सोयाबीन पिकाकडे कल वाढलेला दिसत आहे. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात सोयाबीनला सरासरी ७ हजार रुपयांचा भाव मिळत होता. तर गेल्या खरीपाच्या काढणीच्या वेळेला क्वीटलला ६ हजारांपर्यतचे दर मिळत होते.
सध्या सोयाबीनला ४ हजार ८०० पर्यतचे बाजार भाव आहेत. गेल्या पाच महिन्यात त्यामध्ये जवळपास १ हजार २०० रुपयांची घट झाल्याचे दिसून येत आहे. डिझेलचे वाढलेले भाव वाढलेली मजुरी विज बिल रासायनिक खतांचे वाढलेले दर रासायनिक औषधे यामुळे सोयाबीनला मिळत असलेला दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत तोटका असल्याचे सिद्ध होत आहे.असे असले तरी यावर्षी रासायनिक खतांच्या भाव वाढीबरोबर सोयाबीन बियाणे मध्ये बॅग मागे ४०० ते ५०० रुपयांची भाव वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जून महिना तोंडावर आलेला असताना शेतकऱ्यांकडून खरिपाची पूर्वतयारी सुरू झाली आहे.पावसाळा कसा असेल बियाणे खते डिझेल यांचे भाव काय राहतील परतीच्या पावसात नुकसान होईल का? पिक तयार झाल्यानंतर पुढच्या सीजनला सोयाबीनचे भाव काय असतील असे एक ना अनेक प्रश्न शेतकरी वर्गाला सतावतांना दिसत आहेत.सध्या बाजारपेठेत सोयाबीनची विक्री किंमत घसरली असली तरी याच बाजारपेठेतून अधिकच्या किंमतीने बियाणे खते खरेदी करुन शेतकऱ्यांना जमिनीत पेरावे लागणार असल्याचे चित्र आहे.