सुपा |वार्ताहर| Supa

सुपा परिसरात सहा-सात सप्टेंबरपासून रोज पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या पेरण्या खुपच लांबत चालल्या असल्याने शेतकर्यांना चिंता वाढली आहे.

यावर्षी पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली. सर्वच नक्षत्र मनशोक्त बरसली आजही सप्टेंबर महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना.

महाराष्ट्रात सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये मान्सून परतीच्या प्रवासावर असतो; परंतु चालू वर्षी अजूनही धो-धो कोसळत आहे. त्यामुळे ज्वारी पिकाच्या पेरण्या चांगल्याच पुढे लांबत चालल्या आहेत. साधारणपणे गोकुळ अष्टमीनंतर ज्वारी पेरणीला सुरुवात होते; परंतु सततच्या पावसाने बाळीराजाचे वेळापत्रक बिघडले आहे.

चालू वर्षी पाऊस जरी चांगला असला तरी तो यावर्षी शेतकर्यांना उत्पादन मिळवून देण्यात हानीकारक ठरला आहे. कारण मूग पिकाचे ऐन काढणीच्या काळात मोठे नुकसान केले तर बाजरी पिकालाही काढणीच्या काळात वादळी पावसाने मोठा तडाखा दिल्याने बाजरी पिकांनी जमिनीवर लोंटागण घेतले होते.

अशीच अवस्था जास्तीच्या पावसामुळे इतर पिकांचीही झाली आहे. कांदा रोपे पाण्यात सडू लागली आहेत. तर फुलशेती ही मातीमोल झाली आहे. तर भाजीपाल्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. भाजीपाला शेतातून काढण्यालायक राहिला नाही.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ज्वारी पिकाची कोळपणी, खुरपणी चालू असते परंतु आज घडीला अजून पेरण्याच नाहीत व अजूनही लवकर होण्याचे चिन्ह दिसत नाही. कारण रोज थोडाफार पाऊस पडतोच आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे रान लवकर वापस्यावर येण्याची काहीही चिन्हे नाहीत. एकंदरित एवढा पाऊस-पाणी होऊनही बळीराजाला म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही. अजूनही पाऊस थांबत नसल्याने कांदा लागवड व ज्वारीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.