ज्वारीची भाकरी यंदा करपणार

जादाच्या पावसामुळे पेरणी क्षेत्रात मोठी घट
ज्वारीची भाकरी यंदा करपणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात प्रसिध्द असणार्‍या नगरच्या ज्वारी पिकांचे क्षेत्र यंदा जादाच्या पावसाने घटणार आहे. यामुळे यंदा ज्वारीची भाकर दुर्मिळ होणार असून ज्वारीसाठी नगरकरांना आर्थिक चटके सहन करावे लागणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी ज्वारीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 67 हजार हेक्टर असतांना आतापर्यंत 3 हजार हेक्टरच्या जवळपास ज्वारी पिकाची पेरणी झाली असून यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे कृषी विभागाचा अंदाजे आहे.

राज्याच्या कृषीच्या नकाशावर नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परतीच्या दमदार पावसावर जिल्ह्यातील शेतीचे भवितव्य अवलंबून असते. मात्र, अलिकडच्या काही वर्षात नगर जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पडणार्‍या मान्सूनच्या पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. यंदा तर पावसाने कहर केला असून सरासरीपेक्षा 121 टक्के अधिक पाऊसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टनंतर तर काही भागात गोकुळ अष्टमीनंतर ज्वारीच्या पेरण्या सुरू होता. मात्र, यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे.

यामुळे शेतकर्‍यांना ज्वारी पिकाची पेरणी करणे अवघड झाले आहे. कृषी विभागाच्या नियोजनेनूसार दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत ज्वारी पेरणीचा कालावधी आहे. मात्र, या कालावधीत जिल्ह्यातील पाऊस थांबलेला नाही. यामुळे आता ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट येणार असून पेरणीच नाही, तर उत्पादन कोठून होणार असा प्रश्न आहे. आता पावसाने उघडीप दिल्यास उशीराच्या ज्वारीच्या पेरणीची शक्यता आहे. मात्र, त्याचे प्रमाण कमी राहणार असून यामुळे ज्वारी उत्पादनात मोठी घट होणार असून यंदा सर्वसामान्यांच्या ताटातून ज्वारीची भाकर गायब होणार आहे.

जामखेडच्या ज्वारीला राज्यात मागणी

जिल्ह्याच्या दक्षिण भागात ज्वारीचे पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. विशेष करून जामखेड आणि खर्डा येथील ज्वारी राज्यात प्रसिध्द आहे. मात्र, उत्तरेपेक्षा दक्षिण जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर अधिक असल्याने यंदा जामखेडच्या ज्वारीची बाजारात कमतरता जाणवणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com