ज्वारीचे क्षेत्र 55 टक्क्यांनी घटले !

जादा पावसामुळे पेरणीसाठी वापसा न मिळाल्याचा परिणाम
ज्वारीचे क्षेत्र 55 टक्क्यांनी घटले !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात रब्बी हंगमातील प्रमुख असणार्‍या ज्वारी पिकाची पेरणी गत आठवड्यापर्यंत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 45 टक्के झालेली होती.

आता पेरलेली ज्वारी पीक निसवण्याच्या अवस्थेत असून यापुढे ज्वारीची पेरणी शक्य नाही. यामुळे यंदा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी क्षेत्र घटणार आहे.

नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात या हंगामात ज्वारी हे प्रमुख पिक घेण्यात येते. जिल्ह्यातील दक्षिण भागातील ज्वारी ही राज्यात प्रसिध्द आहे. जिल्ह्यात ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्र असून गत आठवड्यापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 14 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

गतवर्षी या कालावधीत 2 लाख 40 हजार हेक्टरवर पेरणी झालेली होती. यंदा लांबलेला पावसाळा आणि अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ज्वारीच्या पेरणीसाठी पुरेसा वापसा न झाल्याने ज्वारीचे क्षेत्र घटले आहे.

दुसरीकडे यंदा थंडीचे प्रमाण कमी असले तरी 51 हजार हेक्टरव गव्हाची पेरणी पूर्ण झाली असून त्यांची सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 89 टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे. हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 53 हजार हेक्टर असून आतापर्यंत 65 हजार हेक्टरवर पेरणी झाली असून त्याची टक्केवारी 65 टक्के आहे. प्रमुख चारा पिक म्हणून ओळख असणार्‍या मका पिकाचे क्षेत्र 36 हजार हेक्टर असून आतपर्यंत 9 हजार 989 हेक्टरवर म्हणजेच 28 टक्के पेरणी झालेली आहे.

कांद्याची विक्रमी लागवड

जिल्ह्यात विद्यमान परिस्थितीत कांदा पिकाची लागवड ही 85 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडी सुरू असून यंदा कांदा पिकाची विक्रमी लागवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी कांदा लागवडीचा खर्च आणि रोपांची किंमत गगनाला भिडलेली असताना त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com