राहुरी (प्रतिनिधी) -

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा सुरत - नाशिक-अहमदनगर-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग (ग्रीनफील्ड हायवे) मंजूर केल्याची घोषणा

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर आता नगर जिल्ह्यातील नगर, राहाता, संगमनेर व राहुरी तालुक्यातून हा बहुचर्चित मार्ग जाणार असल्याचे आता अधोरेखित झाले आहे. या महामार्गासाठी राहुरी तालुक्यातील सुमारे 24 गावांमधून भूसंपादन करण्यात येणार आहे. तर नगर, राहाता, संगमनेर व राहुरी अशा चार तालुक्यातून जाणारा हा सुरत-हैद्राबाद महामार्ग सुमारे 100 किमीचा राहणार आहे.

दरम्यान, या मार्गासाठी राहुरी तालुक्यातील धानोरे-सोनगाव ते राहुरी (मुळानदी) 22 किमी, राहुरी खुर्द ते डोंगरगण 18 किमी असा तब्बल 40 किलोमीटर अंतर भू-संपादन करण्यात येणार आहे. 22 किलोमीटरमध्ये संपूर्ण बागायत क्षेत्र भूसंपादनामुळे उध्वस्त होणार आहे. सोनगाव, धानोरे, कानडगाव, कनगर, मोमीन आखाडा, वराळे वस्ती, तनपुरे वस्ती, खिलारी वस्ती, उंडे वस्ती, येवले वस्ती, राहुरी खुर्द, कृषी विद्यापीठ, सडे, खंडाबे खुर्द, वांबोरीकडील भागातून हा मार्ग जाणार असून मुख्य सहापदरी, त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या व दोन लेनचा रस्ता प्रस्तावित आहे. जमिनीवर 15 फुटांवर हा महामार्ग होणार आहे.

सुरत - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (ग्रीनफील्ड हायवे) नगर जिल्ह्यातून जाणार असून सन 2018 ला प्रस्तावित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून या मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तब्बल चाळीस किलोमीटर मार्ग जाणार असून यात तालुक्यातील 300 शेतकर्यांच्या बागायत जमिनी शेती व राहती घरे जाणार असल्याने केंद्र सरकारच्या या मार्गाला स्थानिक शेतकर्यांनी विरोधाचा पवित्रा घेतला आहे.

सन 2017-18 मध्ये नाशिक जिल्ह्यातील पांगरी ते नगर जवळील वाळकीपर्यत केंद्रीय सर्वेक्षण पथकाने उपग्रहाद्वारे अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे सर्व्हेक्षण केले होते. त्यानंतर सन 2019 मध्ये अधिसूचना जाहीर करून जिल्ह्यात 4 सक्षम अधिकारी म्हणून राहुरी, नगर, राहाता आणि संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना अधिकार दिलेले होते. मात्र, त्यानंतर त्याची फक्त चर्चाच होत राहिली . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहुरी कृषी विद्यापीठात आले असता शेतकर्यांनी या मार्गाला विरोध करत निवेदन दिले होते .

सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर महामार्गा साठी शेतकर्यांच्या बागायती जमीन जात असल्याने हा महामार्ग बदलण्यात यावा, शेती चे वाळवंट होत असेल तर या महामार्गाचा काय उपयोग? असाही प्रश्न विचारला जात आहे. संगमनेर तालुक्यातील 18, राहाता तालुक्यातील 5, राहुरी तालुक्यातील 24 तर नगर तालुक्यातील 9 गावातील जमिनीचे संपादन केले जाणार आहे.

राहुरी, तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी यापूर्वी मुळा धरण, के.के. रेंजसाठी संपादित झाल्या आहेत. याशिवाय डिझेल वाहिनीसाठी रेल्वेलाईन भागात काही ठिकाणी जमिनी हस्तांतरित झालेल्या आहेत. आता पुन्हा भूसंपादन होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहुरी तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, कनगर, राहुरी, वांबोरी आदी गावांतून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.