‘त्या’ 6 परप्रांतीय आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

डिझेल चोरीचे रॅकेटही उघडकीस येणार
‘त्या’ 6 परप्रांतीय आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

सोनई |वार्ताहर| Sonai

नेवासा तालुक्यातील मोरयाचिंचोरे परिसरात सोमवारी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा परप्रांतीय चोरट्यांना सोनई परिसरातील तरुण मंडळ व पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांना काल नेवासा न्यायालयात हजर केले असता या सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

अटक केलेल्या आरोपींवर सोनई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल अमोल जवरे यांच्या फिर्यादीवरून सहा परप्रांतीय आरोपींवर गुन्हा रजिस्टर फर्स्ट 210/2021 भारतीय दंड विधान कलम 399, 402, 379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या आरोपींना काल मंगळवारी नेसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

दरम्यान आरोपी राहात असलेल्या ठिकाणाहून डिझेलचे 3 मोठे पिंप हस्तगत करण्यात आले. नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरील पेट्रोलपंप, धाबे याठिकाणी मोठी वाहने रात्री जेवणासाठी व मुक्कामासाठी थांबत असतात. या वाहनांमधून डिझेलची चोरी तसेच जबरी चोरी आरोपी करत असल्याची माहिती मिळाली आहे. यावरून डिझेल चोरांचे फार मोठे रॅकेट सक्रिय असण्याचा संभव असून यापूर्वीही रात्रीच्यावेळी महामार्गावर मोठ्या वाहनातून डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

हे चोरीचे डिझेल निम्म्या दराने विकत असल्याची चर्चा ग्रामस्थ करत आहेत. हे रॅकेट कोण चालवत होते? याला आशीर्वाद कुणाचा? हे स्वस्तातले डिझेल कोण खरेदी करत होते? या सर्वांचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थ करत आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

‘सफारी’वरील नंबर स्कॉर्पिओचा

संशयित गुन्हेगारांकडून जप्त केलेल्या सफारी गाडीचा क्रमांक (एमपी 04 सीजी 2007) आरटीओ ऑफिसकडे स्कॉर्पिओ गाडीचा असून या गाडीच्या मालकाचे नाव जितेंद्रसिंग ठाकूर दाखवते. मग या सफारीचा नंबर काय? स्कॉर्पिओ गाडी कुठे आहे? त्या स्कॉर्पिओवर सध्या नंबर काय? या दोन्ही गाड्यांचे मूळ मालक कोण? आतापर्यंत या गाडीत बसून आरोपींनी कोण कोणते गुन्हे केले? या सर्व प्रश्नांचा छडा सोनई पोलिसांना लावावा लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com