सोनगावच्या एका महिलेला करोनाची बाधा

राहुरी तालुक्यात करोनाचा ‘षटकार’; सोनगाव, सात्रळ, धानोरे सात दिवस बंद
सोनगावच्या एका महिलेला करोनाची बाधा

राहुरी, सात्रळ (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यात पाचजणांना करोनाची बाधा झाल्यानंतर काल सोनगाव येथील एक महिलाही पॉझिटिव्ह आढळून आल्याने करोनाने राहुरी तालुक्यात षटकार मारला आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांनी केलेली नियमांची पायमल्ली यामुळे आता राहुरी तालुक्याला करोनाचा विळखा बसू लागला असून करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत.

दरम्यान, सोनगाव येथील महिलेच्या कुटुंबातील पाचजणांना नाशिक येथे पाठविण्यात आले असून संपर्कात आलेल्या पाचजणांना राहुरी विद्यापीठ येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेमुळे सोनगाव, सात्रळ, धानोरे या तीन गावांत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत सात दिवस लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामदक्षता समितीने घेतला आहे.

वांबोरी, देवळाली प्रवरा, केसापूर पाठोपाठ आता सोनगाव येथील रहिवाशी असलेल्या एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. ही महिला आठ दिवसांपूर्वी संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी गेली होती. तेथे आठ दिवस उपचारासाठी दाखल झाल्यानंतर सोमवारी तिला न्युमोनियाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्या महिलेला नाशिक येथे पाठविण्यात आले. तेथेच तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या महिलेसह राहुरी तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आता सहा झाल्याने प्रशासनासह नागरिकांचेही धाबे दणाणले आहेत. केसापूरसह लगतच्या गावांतही नाकाबंदी करण्यात आली असून देवळाली प्रवरा शहरात ज्या भागात बाधित रुग्ण आढळला, तेथील परिसर सील करण्यात आला आहे.

राहुरी तालुक्यात दि. 1 जूनपासून अनलॉक झाल्यापासून सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला होता. नागरिकांनी नियमांची पायमल्ली केल्याने तालुक्यात धोका निर्माण झाला. तर बाहेरगावाहून अनेक नागरिक तालुक्याच्या गावी परतल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले पुणे, मुंबई येथून आलेले अनेक नागरिक खुलेआम फिरत असल्याने प्रसार वाढला.

राहुरी तालुक्यातील केसापूर येथे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेले एकूण 66 व्यक्ती व देवळाली प्रवरा येथील संपर्कातील 7 असे एकूण 73 व्यक्तींना राहुरी येथील कृषी विद्यापीठात दाखल करण्यात आले होते. त्यातील डॉक्टरसह 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 49 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून 20 जणांना होम क्वारंटाईन केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com