७ नंबर फार्म भरून पाणी नाही; पाटबंधारे खात्याचा अजब कारभार

७ नंबर फार्म भरून पाणी नाही; पाटबंधारे खात्याचा अजब कारभार

सोनेवाडी (वार्ताहर)

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील हरिसन ब्रँच चारी अंतर्गत येत असलेल्या ए १ पोटचारीच्या लाभ क्षेत्रातील असलेल्या महिला शेतकरी अमृता अनिल होन यांना सात नंबर फार्म भरून शेतीपिकाला पाणी मिळाले नसल्याने त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. पाटबंधारे खात्याचा हा अजब कारभार असून शेतकऱ्यांचा आता वाली कोणी उरला नाही असा प्रश्न सध्या शेतकरीवर्ग उपस्थित करत आहेत.

पाटबंधारे विभागाच्या भरोशावर सुनील होन व अनिल होन यांनी अमृता होन यांच्या शेतात गहू व कांद्याचे पीक घेतले आहे. या शेतात विहीर नसल्यामुळे पाटपाण्यावरच हे क्षेत्र अवलंबून आहे. नियमाप्रमाणे तीन एकराला पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे सात नंबर फार्म भरण्यात आला होता. सदर परिसरातील चारी एक दिवस पाटबंधारे विभागाने सोडली. व या शेतकऱ्याला कोणतीच कल्पना न देता चारी बंद करण्यात आली. मागणी करून देखील आपल्या शेतीला पाणी न मिळाल्यामुळे सुनील होन यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना आम्हाला पाणी का मिळाले नाही याचा जाब विचारला.

मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही पाणी घेण्यासाठी आमच्यापर्यंत का आले नाही असे अजब उत्तर दिले. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी चारी सुटल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांला पाणी देणेबाबत कल्पना द्यायला हवी होती. मात्र तसे न होता अचानक चारी बंद केल्याने होन यांच्या तीन एकर क्षेत्राचे आता नुकसान झाले आहे. लवकरच नुकसान भरपाईसाठी नाशिक पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे होन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com