तेल्या व टिपका रोगाने शेतकर्‍यांवर डाळींब बागा तोडण्याची वेळ
सार्वमत

तेल्या व टिपका रोगाने शेतकर्‍यांवर डाळींब बागा तोडण्याची वेळ

Arvind Arkhade

सोनेवाडी |वार्ताहर|Sonewadi

डाळिंबावर तेल्या रोगाने आक्रमण केले, फळांवर पडलेल्या काळ्या टिपक्याने डाळिंब उकिरड्यावर फेकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. परंतु शेतकर्‍यांची दया सरकारला येत नाही. तीन वर्षांपूर्वी लावलेले डाळिंबाचे बाग आता तोडणार आहोत असे डाळिंब उत्पादक शेतकरी सुभाष आव्हाड यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे सुभाष आव्हाड यांची 3 एकर डाळिंबाची बाग आहे. डाळिंब बागेसाठी त्यांना यावर्षी 3 लाख रुपये खर्च आला. आठ लाख रुपये खर्चून त्यांनी 17 एकर कांदे केले होते. परंतु अवकाळी पाऊस व करोना व्हायरसमुळे मागणी नसल्याने कांदा माती मोल विकावा लागला. डाळिंबाचे पैसे हाती लागतील म्हणून डाळिंबावर खर्च केला मात्र तेथेही चित्र उलटे झाले.

तेल्या रोग व काळ्या टिपक्याने उभ्या असलेल्या डाळिंबांची फळे गळून पडली. चालू वर्षी आव्हाड यांचा झालेला खर्च या पिकातुन निघणार नसून त्यांना जवळपास 7 लाख रुपये तोटा होणार आहे. अवकाळी पावसाने मागच्या वर्षी आजूबाजूच्या शेतकर्‍यांचे पंचनामे झाले. त्यांना पंचनाम्याचे पैसेही मिळाले मात्र आव्हाड यांच्या हाती काहीच आले नाही.

ज्यांनी पिक विमा काढला त्यांना पीक विम्याचे पैसे मिळतील म्हणून त्यांनी कंपनीकडे पीक विम्याची मागणी केली मात्र त्या खासगी कंपनीने ही त्यांची दखल घेतली नाही. कोपरगाव तालुक्यात प्रगतशील शेतकरी म्हणून आव्हाड यांची ओळख आहे. सदन शेतकर्‍यांवर ही वेळ येत असेल तर अल्पभूधारक शेतकर्‍यांची परिस्थिती याच्याही पेक्षा कठीण झाली आहे.

खर्च करून शेतीतून उत्पन्न मिळते मात्र उत्पादीत झालेल्या मालाला भाव मिळत नसेल तर शेती कसवायची का प्रश्नही सुभाष आव्हाड, सतीश आव्हाड, तुळशीराम आव्हाड यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला द्यावेत व नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com