अखेर सोनेवाडीत बिबट्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा

अखेर सोनेवाडीत बिबट्यासाठी वन विभागाने लावला पिंजरा

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील सोनेवाडी (Sonewadi) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने (Leopard) दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने (Forest Department) हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच गंगाराम खोमणे, उपसरपंच किशोर जावळे, पोलीस पाटील दगु गुडघे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे यांनी केली होती. सदर परिस्थितीचा आढावा घेत कोपरगाव वनविभागाचे वनक्षेत्रपाल अधिकारी श्रीमती प्रतिभा सोनवणे, वनपाल भाऊसाहेब गाडे, वनसेवक इंद्रभान शेळके यांनी काल बिबट्या जेरबंद (leopards Cages) करण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून दिला.

सावळीविहीर (Savalvihir), रांजणगाव देशमुख (Rajangav Deshmukh) रस्त्याच्या बाजूला सोनेवाडी (Sonewadi) डोऱ्हाळे (Dohrale) कार परिसरात तुकाराम बाबुराव गुडघे यांच्या उसाच्या शेताजवळ हा पिंजरा बसवण्यात आला.

यावेळी उपसरपंच किशोर जावळे, वनसेवक इंद्रभान शेळके,सोनेवाडी सोसायटी चे संचालक दिलीप गुडघे, राहाता बाजार समितीचे संचालक सुनील जपे, सार्थक गुडघे, विलास गुडघे, भाऊसाहेब खरे आदींनी मेहनत घेत योग्य दिशा ठरवत हा पिंजरा बसविण्यासाठी मदत केली. बिबट्याला चकवा देण्यासाठी पिंजऱ्यामध्ये रात्री बकरी ठेवण्यात येणार आहे.

या परिसरात अनेक लोकवस्ती असून लोक वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असल्याने या बिबट्याच्या धाकाने नागरिकांना पहारा देण्याची वेळ आली होती. डाऊच खुर्द, डोराळे,घारी नंतर हा बिबट्या पुन्हा एकदा सोनेवाडी परिसरात आढळून आला. बिबट्याचे व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावरही वायरल केले होते. या बिबट्याच्या धाकाने शेतकऱ्यांनाही आपल्या शेतात जाणे कठीण झाले होते.

बिबट्याला लपण्यासाठी प्रचंड उसाचे शेत असल्याने हा बिबट्या या नागरिकांत घबराट निर्माण करून देत होता. काल पंचकेश्वर शिवारातील सोनेवाडी येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावत नागरिकांमध्ये पसरलेली भीती थोडीशी कमी केली. जोपर्यंत या परिसरात बिबट्याचा वावर आहे तोपर्यंत एकट्या दुकट्याने शेतात जाण्याचे टाळावे. लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com