सोनेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या जखमी

सोनेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या जखमी

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा सुरू झाली असून सोमवारी रात्री दोन शेळ्या त्याने जखमी केल्या. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी आप्पासाहेब जावळे यांनी केली आहे.

गोदावरी उजव्या कालव्याच्या कडेला सोमवारी रात्री साडेदहा वाजता आप्पासाहेब मोहन जावळे यांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला केला. शेडमध्ये बांधलेल्या शेळीला जखमी केले. जनावरांचा व कुत्रे भुंकण्याचा आवाज आल्यावर घरात असलेल्या रजुबाई आप्पासाहेब जावळे व ताराबाई रामदास जावळे यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी आरडाओरड करत शेजार्‍यांना आवाज दिला. रामदास जावळे यांनी ट्रॅक्टर चालू करत आप्पासाहेब जावळे यांच्या वस्तीवर आणला.

ट्रॅक्टरचा प्रकाश व फटाके वाजवत बिबट्याला तिथून पळून लावले. मात्र हाच बिबट्या पुन्हा रात्री अडीच वाजता शेजारीच असलेल्या रामदास गजानन जावळे यांच्या वस्तीवर आला. तेथे असलेल्या शेळीवर त्याने हल्ला करत तिलाही जखमी केले. सध्या ऊस तोडणीची लगबग चालू असल्याने या बिबट्याने मोर्चा गावाकडे व वस्तीकडे वळवला आहे. वन विभागाने या बिबट्याला पिंजरा लावून तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com