सोनेवाडी चांदेकसारे परिसरात अतिवृष्टी

डाऊच खुर्द येथेही शेतीचे प्रचंड नुकसान, नगर, वांबोरीतही धो-धो पाऊस
सोनेवाडी चांदेकसारे परिसरात अतिवृष्टी

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

काल गुरुवारी संध्याकाळी चारनंतर आलेल्या पावसाने कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, सोनेवाडी ,पोहेगाव, डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी आदी परिसरात दाणादाण उडवून दिली.

सतत दोन तास धो धो पाऊस झाल्यामुळे सोनेवाडी नगरवाडी परिसरातील पावसाचे वाहुन आलेले पाणी व चांदेकसारे येथे झालेल्या अतिवृष्टीने काही घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

समृद्धी महामार्गाच्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये एक दुचाकीस्वार पडल्यामुळे जखमी झाला. त्याला तात्काळ कोपरगाव येथे वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती माजी सरपंच केशवराव होन यांनी दिल्यानंतर तहसीलदार योगेश चंद्रे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी मशिनच्या साह्याने सदर पावसाचे पाणी नळी खोदून देत घरामधील घुसलेले पाणी कमी करण्यात आले.

काल गुरुवारी झालेल्या पावसाचे पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे, घारी, डाऊच खुर्द ,जेऊर कुंभारी अदी परिसरात दाणादाण उडूवून दिली. सतत दोन तास ढगफुटी झाल्या सारखा पाऊस पडत होता. पावसामध्ये वार्‍याचेही प्रमाण असल्याने सोनेवाडी पोहेगाव चांदेकसारे परिसरातील मका व ऊस शेतीचे नुकसान झाले.

उसाचे पिक जमिनीवर पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.डाऊच खुर्द परिसरातही मका, सोयाबीन पिकांमध्ये अतिवृष्टीचे आलेले पाणी घुसल्याने सदर पिके जमीनदोस्त झाली आहेत. सरपंच संजय गुरसळ यांनी सदर परिस्थिती बघून या पिकांचे नुकसानीचे पंचनामे व्हावे म्हणून मागणीही केली आहे. सोनेवाडी येथे वादळी पावसाने गावात वीज पुरवठा करणार्‍या पोलच्या तारेवर झाड उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी आनंदवाडी दयानंद वाडी अतिवृष्टीच्या पाण्याखाली गेली होती तीच आठवण काल झालेल्या पावसाने पुन्हा ताजी केली. चांदेकसारे परिसरात सध्या समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे त्यामुळे वाहून येणारे पाणी कामामुळे आणले जाते.

सदर पाणी चर काढून नदीला सोडण्यात येण्यासाठी अनेकांनी मागणी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने काल चांदेकसारे मध्ये पाणी घुसले. प्रसंगावधान राखत माजी सरपंच केशवराव होन व त्यांच्या टीमने परिस्थिती नियंत्रणात आणली. काल झालेल्या पावसाने किती नुकसान झाले याचा अंदाज

आज दिवसभरात येईल. चांदेकसारे व डाऊच खुर्द परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती उद्या ग्रामपंचायत कार्यालयात देण्यासाठी सरपंच पुनम खरात, उपसरपंच विजय होन व डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ यांनी नागरिकांना कळविले आहे.

नगर शहरासह ग्रामीण भागात धो-धो पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात गुरूवारी सायंकाळी ते रात्री उशीरापर्यंत पावसाने चांगलेच धुतले. नगर शहरात तर सलग तिसर्‍या दिवशी तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळे ऐन करोना संकाटात नगरकांराची धावधाव झाली.

गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास नगर शहरात तासभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरात अनेक सखल भागात पाणी साठले. गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी ते रात्रीच्य वेळी पाऊस झोडपून काढत आहे.

यामुळे नगकर चांगल्याच त्रासाला सामोरे जात आहेत. यासह ग्रामीण भागात दरोज होणार्‍या पावसामुळे खरीप हंगामी काढण्यास आलेली पिके सडली असून रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्यास वापसा नसल्याने शेतकर्‍यांची अडचण झाली आहे. गुरूवारी रात्री मेघगर्जनेस वांबोरी, कात्रड, गुजांळे, नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजूरसुंभे, पिंपळगाव माळवी, जेऊर या ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com