
सोनई |वार्ताहर| Sonai
सोनईत मार्च एण्डच्या नावाखाली दुचाकी व चार चाकी वाहनांची अचानकपणे तपासणी होत असून वाहनांना दंड आकारला जात आहे. पण त्याची कुठलीही पावती किंवा ऑनलाईन दंड झाला नसल्याचे दिसते मग जमा झालेल्या दंडाची रक्कम नेमकी कोणाच्या पाकिटात जमा होत आहे? हा विषय चर्चीला जात आहे. वाहतूक पोलिसांच्या या अर्थपूर्ण शक्कल विषयी ग्रामस्थ व चालकांत उघड चर्चा होताना दिसत आहे.
काही दिवसांपासून सोनईत दुचाकी, चारचाकी तपासणीच्या नावाखाली अचानकपणे चौकाचौकांत उभे राहून, राहुरी-सोनई, नगर-संभाजीनगर मार्गावर उभे राहून पोलीस ठाण्याचे पथक वाहनांना दंड आकारत आहे. काही वाहनांना दंडाची पावती दिली जाते तर अनेकांबरोबर अर्थपूर्ण तडजोड केली जात असल्याचे वाहन चालक सांगतात.
दंडाची कुठलीही पावती किंवा ऑनलाईन दंड झाला असल्याचे वाहनधारकांना दिसत नाही. मग जमा झालेल्या दंडाची रक्कम नेमकी कुठे गेली?
केसेस दाखल नको म्हणून पावतीची विचारणा वाहनधारक करत नाही त्यामुळे ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ अशी परिस्थिती सध्या सोनईत आहे. शिर्डीहून येणार्या अवैध प्रवासी वाहतूक करणार्या 400 ते 500 वाहनांची संख्या आहे. त्यांची प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वाहतूक कर्मचार्यांशी खासगीरित्या भेट जर झाली नाही तर अशा वाहनांना थांबवून केसेस दाखवल्या जातात. भरघाव चालणार्या या अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांमुळे अनेकवेळा मोठमोठे अपघात झाले आहे. तरीही पोलीस यंत्रणा फक्त मलिदा मिळत असल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत.
सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध कट्टे, जुगाराचे अड्डे, अवैध दारूचे अड्डे नगरच्या एलसीबीला सापडतात पण सोनई पोलिसांना हे ठिकाण का सापडत नाही? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे.