सोनईत पावसाची पुन्हा जोरदार हजेरी; अनेक दुकानांत शिरले पाणी

लांडेवाडीत वीज कोसळल्याने घराची भिंत पडली
सोनईत पावसाची पुन्हा जोरदार हजेरी; अनेक दुकानांत शिरले पाणी

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनईसह परिसरात बुधवारी रात्री ते गुरूवारी सकाळपर्यंत दहा ते बारा तास जोरदार पाऊस होऊन कौतुकी नदीला मोठा पूर येऊन नवी पेठेतील अनेक दुकानांत पाणी घुसले. रात्रीच लांडेवाडी येथे एका घरावर वीज पडून घराची भिंत कोसळली आहे.

सोनईत 94% पाऊस होऊन कौतुकी नदीला पाचव्यांदा आलेल्या मोठ्या पुराने वाहतूक विस्कळीत झाली. नवी पेठ, अर्बन बँकपरीसर, संभाजी चौक,भाजी मंडईतील अनेक दुकानात पाणी घुसले. सकाळपासून पाणी वाढत असल्याचे पाहून सरपंच धनंजय वाघ व ग्रामविकास अधिकारी संदीप वाडेकर यांनी नवीपेठेतील प्रत्येक दुकानात जाऊन व्यापार्‍यांना दुकानातील साहित्य हलवण्याचे सांगितले तर उदयन गडाख मित्रमंडळाच्या सदस्यांनी दुकानदारांना साहित्य हलविण्यासाठी मदत केली.

पावसाने सोनईसह परिसरात पाणीच पाणी होऊन अनेक ओढ्यांना पूर आल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला. सततच्या पावसाने ये-जा करणेही कसरतीचे झाले आहे. सगळीकडे पिकांची हानी झाली असून ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या पावसाने पीक हातचे गेले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी सकाळपासून गर्दी केली होती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी नदीकाठी उभ्या असलेल्या ग्रामस्थांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवले.दहा ते बारा तास पाऊस पडल्याने परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला.

रात्री झालेल्या पावसात लांडेवाडी परिसरात शेतकरी सुखदेव लांडे यांच्या घरावर वीज पडून घराची भिंत कोसळली असून त्यांच्याच जुन्या वस्तीवरील झाडावर वीज पडली. लांडेवाडी परिसरातील अनेक घरांतील इन्व्हर्टर व वीज उपकरणे बंद पडली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख यांनी लांडेवाडी गावाला भेट दिली.पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने नवी पेठेतील व्यापारी व नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून दिवसभर ग्रामपंचायतचे कर्मचारी करत होते.

ओला दुष्काळ जाहीर करा

जोरदार पावसाने सोयाबीन, कपाशी, चारापीक, भाजीपाला व कांद्याचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याने शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करत कोणतीही अट न घालता शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन अशोक बेल्हेकर, जालिंदर एळवंडे, भाऊसाहेब दरंदले आदी शेतकर्‍यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com