सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राने ओलांडला 3 हजार लसींचा टप्पा

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राने ओलांडला 3 हजार लसींचा टप्पा

सोनई (वार्ताहर) - सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करोना संसर्गावरील लसीकरण अतिशय नियोजनात सुरु आहे. काहींना पहिला तर काहींना लसीकरणाचे दोन्ही डोससह आतापर्यंत तीन हजार लस देण्याचा टप्पा पूर्ण झाला आहे.आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक लस पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सूर आहे.

सोनईत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सुर्यवंशी, सरपंच धनंजय वाघ, कामगार तलाठी दिलीप जायभाय, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांच्या उपस्थितीत लस देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. उपलब्ध लस संख्येनुसार रोज नियोजन केले जाते. आरोग्य केंद्राच्या वतीने याठिकाणी बसण्यासाठी सावली, पिण्याचे पाणी, सॅनिटायझर आदी सुविधा करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाचे डॉ.कसबे, आरोग्य सहायक डॉ.रमेश जावळे, डॉ. संध्या देशमुख, राजेंद्र पाटोळे, एन. एम. तोगे, मिनल पाटील, अलका बर्डे, एन. व्ही.वीरकर, अमोल लोहकरे, केरु दरंदले यांचा सहभाग असलेल्या या पथकाने आज गुरुवारअखेर 3013 लस दिल्या आहेत. दररोज सकाळी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागत असून अपुर्ण साठ्यामुळे अनेकांना रोजच हेलपाटा होत आहे.

लस घेण्यासाठी होत असलेली गर्दी व त्यामुळे होत असलेली अडचण लक्षात घेवून माजी पंचायत समिती सदस्य बापूसाहेब बारगळ दररोज या ठिकाणी उपस्थित राहून नावनोंदणी व वेळेचे नियोजन करत आरोग्य विभागास सहकार्य करत आहेत. करोना संसर्गाची वाढलेली स्थिती व रॅपीड अ‍ॅन्टीजेन तपासणीचे काम असताना लस देण्याचे काम अतिशय नियोजनात सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com