सोनई पोलिसांची युवकास अमानुष मारहाण

कारवाई न केल्यास आंदोलन; पोलीस अधिक्षकांना निवेदन
सोनई पोलिसांची युवकास अमानुष मारहाण

सोनई |वार्ताहर| Sonai

गणेशवाडी येथील युवकास समज देण्याच्या कारणाने पोलीस ठाण्यात अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते या युवकास समज देण्याचे नावाखाली सोनई पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीररित्या न्यायालयाचे समन्स आदेश, सर्च वॉरंट नसताना सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कर्मचारी संजय चव्हाण व अनोळखी कर्मचारी या सर्वांनी बेकायदेशीररित्या मारहाण केली असल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. सदर युवकाला अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून युवकाची परीस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

याविषयीचे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन दिले असून युवकास मारहाण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको, अमरण उपोषण या प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिलेला आहे.

कार्यक्षम अधिकार्‍याची गरज

तीन महिन्यांपूर्वी प्रभारी म्हणून बदलून आलेले सचिन बागुल यांच्या कार्यकाळात परिसरात अवैध धंदे, चोर्‍या, चोरटी वाळू तस्करी वाढली असून गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ होत असून दाखल गुन्ह्यांचा तपास शून्य असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे. याठिकाणी कार्यक्षम व खमक्या अधिकार्‍याची गरज आहे.

Related Stories

No stories found.