चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सोनई पोलिसांची दुसर्‍या घटनेतही टाळाटाळ

चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सोनई पोलिसांची दुसर्‍या घटनेतही टाळाटाळ

सोनई |वार्ताहर| Sonai

येथून जवळ असलेल्या शिरेगाव येथील तुवर वस्तीवर चार दिवसापूर्वी सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी तलवार व इतर हत्यारासह घरात घुसून चोरीचा मोठा थरार केला असतानाही सोनई पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. या घटनेत घरातील मूकबधिर शेतकर्‍यास मारहाण झालेल्या गंभीर घटनेबाबत ग्रामस्थांत कुजबूज सुरु झाली आहे.

शिरेगाव-सोनई जुन्या रस्त्यावर असलेल्या तुवरवस्ती येथे सूर्यकांत व विजय ज्ञानदेव तुवर या दोन भावांची घरे आहेत. सूर्यकांत तुवर हे घराला कुलूप लावून मुळा कारखाना येथील घरी होते तर मूकबधिर असलेले विजय तुवर एकटेच घरी होते. मध्यरात्री एक ते दोन वाजता पाच चोरटे दरवाजा तोडून घरात घुसले.तीन चोरटे अंगणात उभे होते. तलवार उगारुन मूकबधिर विजय यास मारहाण केली. रात्री अडीच वाजता सूर्यकांत तुवर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली होती.

तुवर बंधू फिर्याद देण्यासाठी गेले असता घटनास्थळी येवून माहिती घेवू असे सांगत टाळाटाळ झाल्याचे समजते. हद्दीत शेळ्या व मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना होवूनही नोंद घेत नसल्याचे चित्र आहे. वरीष्ठांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मूकबधिर शेतकर्‍यास मारहाण व एक ते सव्वा तोळ्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे सूर्यकांत तुवर यांनी सांगितले असून याबाबत फिर्याद देणार असल्याचे सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com