सोनई हॉटस्पॉट घोषित; 70 ते 80 जण केले क्वारंटाईन

उपाययोजनांबाबत ना. गडाखांनी केली अधिकार्‍यांशी चर्चा; प्रशासनाला सहकार्याचे आवाहन
सोनई हॉटस्पॉट घोषित; 70 ते 80 जण केले क्वारंटाईन

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनई गावात 10 रुग्णांना करोनाची लागण झाल्याने सोनई गाव 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट घोषित करण्यात आले असून गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत.

नामदार शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेची माहिती घेतली असून सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनई येथे आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची करोना चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या 22 लोकांपैकी 10 जण करोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात येऊन उपाययोजना चालू केल्या.

आणखी अतिजोखमीच्या असलेल्या सुमारे 50 लोकांच्या स्त्रावाची चाचणी घेण्यात येणार आहे. या अतिजोखमीच्या लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 70 ते 80 लोकांना क्वारंटाईन करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शुक्रवार (दि. 10 जुलै) रोजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्धन सोनवणे उपस्थित होते.

तालुक्यातील जनतेला आवाहन करताना नामदार गडाख यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी सोनईत एका व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले असून सर्वांनी काळजी घ्यावी व तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील करोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे.

सोनईत हॉटस्पॉट घोषित केल्याने सर्व दुकाने बंद राहणार आहेत. याकाळात अत्यावश्यक सुविधांबाबत कशा प्रकारच्या उपाययोजना करणार आहे. करोनाबाधित लोकांच्या कोण कोण संपर्कात आले आहे, किती लोकांच्या टेस्ट करणार आहे अशा विविध बाबींवर नामदार गडाख यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

सोनई ग्रामपंचायतशी संबंधित कालच्या 10 पॉझिटिव्हमध्ये एक ग्रामपंचायत सदस्य असल्याचे समजले असून स्राव नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतरही एकाने सोनईतील बर्‍याच जणांच्या भेटी घेतल्या होत्या व रात्री तोच पॉझिटिव्ह निघाल्याने त्याच्या कुटुंबालाही स्राव तपासण्यासाठी नेवासा येथे नेण्यात आले. शुक्रवार 10 रोजी माळी, टकार, न्हावी गल्लीतील 70-80 लोक क्वारंटाईन करण्यात आले. त्यात सोनई ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांपैकीही काहीजण असल्याचे समजले आहे.

तालुक्यातील अनेकांना क्वॉरंटाइन केले आहे. त्यातील अनेकांशी नामदार गडाख यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून त्यांची विचारपूस केली व प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जात असली तरी नामदार गडाख यांनी स्वतंत्र यंत्रणेद्वारे तालुक्यातील क्वारंटाईन केलेल्या लोकांना गरजेच्या वस्तू पोहच करण्यास सुरुवात केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com