सोनईत विनाकारण फिरणार्‍या 56 जणांची अ‍ॅन्टीजेन चाचणी

पाचजण आढळले संक्रमित
सोनईत विनाकारण फिरणार्‍या 56 जणांची अ‍ॅन्टीजेन चाचणी

सोनई (वार्ताहर) - सोनई परिसरात सोनई पोलीस, आरोग्य विभाग व करोना नियंत्रण समितीने रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या 56 जणांची अ‍ॅन्टीजेन तपासणी केली. त्यात सापडलेल्या 5 पॉझिटिव्ह व्यक्तींची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

बसस्थानकासमोरील रस्त्यावरील मोठी वर्दळ पाहता सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली चाचण्या करण्यात आल्या. यावेळी करोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरपंच धनंजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे उपस्थित होते.

पॉझिटिव्ह सापडलेल्या पाच जण शिंगणापूर कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचा आदेश काढला असताना व विनाकारण घराबाहेर पडू नये असा आदेश लागू केला असताना रस्त्यावर गर्दी होत आहे. संसर्गात वाढ होवू नये म्हणून सोनई ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व सहायक पोलिस निरीक्षक कर्पे,बाबा वाघमोडे व पथकाने मोहीम राबविली.

सकाळी अकरा वाजेपर्यंत किराणा दुकानास परवानगी असली तरी दिवसभर अनेक दुकानात चोरुन धंदा होत असल्याचे बोलले जात आहे.

शटर बंद असले तरी मोठी दुकाने चालू

31 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश असताना मोठे दुकानदार दुकानाचे शटर बंद करून एक कर्मचारी बाहेर बसून आलेले गिर्‍हाईक दुकानात घेऊन मालाची विक्री करत असल्याचे आढळून येत आहे. या दुकानांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com