कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 11 गायी-वासरांची मुक्तता
सार्वमत

कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या 11 गायी-वासरांची मुक्तता

सोनई पोलिसांची चांद्यात कारवाई; एकास अटक

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

कत्तल करण्याच्या उद्देशाने चांदा येथे उसाच्या शेतात निर्दयतेने दोरखंडाने बांधलेल्या 11 गोवंश जनावरांची सोनई पोलिसांनी छापा टाकून सुटका केली. याबाबत सोनई पोलिसांच्या फिर्यादीवरुन चांदा येथील एकाला अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकासह चांदा येथे गेले असता घोडेगाव-चांदा रस्त्यालगत कालू शेख याच्या उसाच्या शेतात 9 गायी व 2 वासरे अशी जनावरे दोरखंडाने झाडाच्या बुंध्याला बांधलेली आढळून आली.

90 हजार रुपये किमतीच्या 9 गायी व 10 हजार रुपये किमतीची दोन वासरे अशी एक लाख रुपये किंमतीची गाय वासरू प्रवर्गातील 11 जनावरे यांची कत्तल करून चोरून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने अन्न-पाणी निवारा यांची सोय नसताना त्यांची देखभाल न करता दोरखंडाने क्रूरतेने बांधलेल्या स्थितीत मिळून आली.

यावरून सोनई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षक अधिनियम (सुधारित) चे कलम 5(ब)(क) सह प्राण्याला क्रूरतेने वागवणे अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे सोनई पोलीस ठाण्यात 295/2020 क्रमांकाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी साजिद इस्लाम शेख (वय 28) रा. कुरेशी मोहल्ला चांदा याला अटक करण्यात आली.

या कारवाईसाठी सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचेसह पथकात सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, हवालदार संजय चव्हाण, पोलीस शिपाई बाबा वाघमोडे, कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे, कॉन्स्टेबल अमोल भांड यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी माने करीत आहेत. दरम्यान या कारवाईचे घोडेगाव चांदा भागातून स्वागत करण्यात आले असून गोवंश जनावरांच्या बाबतीत पोलिसांनी कारवाईचे सातत्य ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com