Corona
Corona
सार्वमत

सोनईत आणखी दोघे संक्रमित; 12 अहवालांची प्रतिक्षा

ना नफा ना तोटा तत्वावर भाजीपाला विक्री; सोनई पोलिसांची विनामास्क फिरणार्‍यांवर 19 जणांवर कारवाई

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

सोनईत काल सायंकाळी आणखी दोघांचा अहवाल संक्रमित आला आहे. तर काल 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉटस्पॉट जाहीर झाल्यामुळे नागरिकांची अडचण ओळखून सोनई मधील दहा-बारा गल्ल्यामध्ये भाजीपाला ना नफा ना तोटा या तत्वावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दादा वैरागर, सरपंच संदीप कुसळकर, उपसरपंच नितीन दरंदले, मनोज वाघ, सखाराम राशीनकर या ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य मंडळाने परीसरातील शेतकर्‍यांकडून भाजीपाला खरेदी करुन गावातील काही ठिकाणी वितरणाचे स्टॉल लावले आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

तसेच काही दिवसांपूर्वी एका महिलेने नगरच्या खासगी लॅब मध्ये स्राव दिला होता. तीने सोनईचा पत्ता व मोबाईल नंबर दिला होता. ही महिला काल पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती सोनईत येताच सकाळपासून ग्रामपंचायत प्रशासनाने सदर महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तपास लागलेला नाही. तपासाअंती ही महिला सोनईची नसल्याचे समजते.

चांदा, करजगाव व खेडले येथे विना मास्क फिरणार्‍या 19 व्यक्तींवर सोनई पोलिसांनी कारवाई केली. पोलीस प्रशासन, ग्राम प्रशासन यांच्याकडून सोशल डिस्टंसिंगबाबत आणि मास्क वापरणे बाबत वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे. तरीही अनेकजण या नियमांना बगल देत असल्याचे समोर आले आहे.

यापुढे कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून कामकाज करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी केले.

सोनईत कोरोना बाधित सापडलेने हॉटस्पॉट जाहीर करुन लॉकडाऊन केलेले होते परंतु या कालावधीत गोरगरीब लोकांचे दैनंदिन आवश्यक वस्तूसाठी मोठे हाल झाले. आता 24 तारीख आली आहे त्यामुळे प्रशासनाने दुकाने उघडण्याच्या तारखेबाबत योग्य तो निर्णय सर्वांना अपेक्षित आहे

- कारभारी डफाळ अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन सोनई

ग्रामपंचायतीने आज चौकात जी भाजीपाला विक्री दुकाने थाटली त्याऐवजी भाजीपाला विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी देणे आवश्यक होते. ग्रामपंचायतीची दुकानदारी कशासाठी? ते स्वस्त भाजीपाला देणार आहेत काय ?

सोनई येथे काल आरोग्य विभागाने हायरिक्स मधील संपर्क आलेल्या 5 व्यक्तींना तपासणीसाठी नेले होते. त्यापैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून करजगाव येथून खाजगी तपासणीसाठी गेलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे. सोनईतील 7 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून सायंकाळी उशीरा समजले आहे. सोनईत आतापर्यंत करोना संक्रमणामुळे एकाचा मृत्यू झाला तर बाधितांची संख्या 41 वर गेली आहे. परिसरातील शिंगणापुरात एक तर करजगावात दोघे संक्रमित आहेत. सोनईतील आतापर्यंत 115 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले असून आता फक्त 12 जणांच्या अहवालांची प्रतिक्षा आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com