सोनई झाली करोनामुक्त; सर्व 41 जण घरी परतले
सार्वमत

सोनई झाली करोनामुक्त; सर्व 41 जण घरी परतले

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

जुलै महिन्यात आधी एकाला व नंतर एकाचवेळी 10 जणांना करोना corona बाधा झाल्याने बहुचर्चित झालेली सोनई जुलैच्या अंतिम टप्प्यात करोनामुक्त झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. संक्रमित झाल्याने उपचार घेत असलेल्या सर्व 41 जणांचे अहवाल आता निगेटीव्ह negitive आल्याने ते घरी परतले असून त्यामुळे सोनईकर sonai सुखावले आहेत.

सोनई गावातील एकूण संक्रमितांची संख्या 41 झालेली होती. हे सर्वजण करोनामुक्त झालेले असून उर्वरित दोघांना कालच घरी सोडण्यात आलेले आहे. सोनईचा अद्यापपर्यंत कुठलाही अहवाल प्रतीक्षेत नाही तसेच नवीन कोणाचेही स्वॅब घेतलेले नाहीत. गेल्या 4-5 दिवसांतून सोनईत एकाही नवीन रुग्णाची भर पडलेली नाही तसेच प्रशासनाने हॉटस्पॉट शिथिल केल्याने सर्व व्यवहार सुरळीत चालू झालेले आहेत.

दररोज सकाळी 9 ते 5 या वेळेत व्यापारी पेठ, दुकाने चालू झालेली आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनईची पोलीस गाडी गाव पेठेत फिरत असते. पोलीस गाडीचा सायरन वाजताच थोडीशी धावपळ होते. तसेच विनामास्क फिरणार्‍या लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राजेंद्र कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक, आशा सेविका घरोघर जाऊन रुग्णांची माहिती घेत असून उपलब्ध औषध, गोळ्या देत आहेत. सोनईचे कुणीही संशयित रुग्ण नेवासा अगर इतर कोव्हिड सेंटरमध्ये नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कुणाचेही अहवाल प्रतीक्षेत नाहीत.

सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील करजगाव तालुका नेवासा येथे तामतळेवस्तीवर 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने करजगावच्या वस्तीवरील ‘त्या’ पॉझिटिव्हच्या संपर्कातील स्राव तपासणीसाठी पाठवलेले आहेत. दरम्यान सोनईचे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले असले तरी अद्याप धोका पूर्णपणे टळलेला नाही.

सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्स पाळून काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. घरीच सुरक्षित राहून करोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सोनई प्रेस क्लबच्यावतीने करण्यात आलेले आहे.

सोनई बरोबरच करजगाव, घोडेगाव, कांगोणी भागातही दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Deshdoot
www.deshdoot.com