सोनईत सावधगिरी म्हणून दुकाने व व्यवहार बंद
सार्वमत

सोनईत सावधगिरी म्हणून दुकाने व व्यवहार बंद

22 जणांच्या स्त्रावांच्या अहवालाची प्रतिक्षा; प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून

Arvind Arkhade

सोनई|वार्ताहर|Sonai

औरंगाबाद गंगापूर भागातून सोनईत आलेल्या एका 54 वर्षीय नोकरदाराच्या झालेल्या मृत्यूबाबत विविध शंका कुशंका घेण्यात येत आहेत. तसेच करोना संसर्गाच्या भीतीने घबराट निर्माण झाल्याचे पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने बुधवार 8 जुलैपासून सोनई येथील बाजारपेठा व व्यवहार बंद करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घोषित केला. पहिल्याच दिवशी व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले.

दिवसभर सर्व बाजारपेठा आणि व्यवहार पूर्णपणे बंद होते तसेच यापूर्वी रस्त्यावर दिसणारी गर्दी बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याचे जाणवले. ग्रामपंचायतीचे ध्वनिक्षेपकावरुन बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या होत्या.

दवाखाने मेडिकल चालू होते. मात्र मंगळवार 7 जुलैच्या त्या संशयास्पद मृत्यू झालेल्या इसमाचा जेथे जेथे संपर्क आला अशा 22 व्यक्तींचे स्त्राव शासकीय लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अधिकृत अहवाल बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त न झाल्यामुळे प्रशासनाने अद्याप कडक भूमिका घेतलेली नाही.

मात्र मृत असलेल्या गल्लीतील काही व कुटुंबातील व्यक्ती बरोबरच सोनईत ज्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते ते डॉक्टर, रक्तनमुने घेणारा लॅब चालक तसेच मेडिकल स्टोअर चालकाचेही घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समजते. अद्याप पर्यंत कुणाचेही तपासणी अहवाल प्राप्त झालेले नसले तरी प्रतिबंधक उपाययोजना व सावधगिरी म्हणून सोनई बंदचा निर्णय घेण्यात आला.

ज्या गल्लीत मृत व्यक्तीचे दहा-पंधरा दिवस वास्तव्य होते तेथे येणारे व जाणारे रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले असून प्रशासनाच्या स्थानिक अधिकारी, तलाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

सोनईतील बर्‍याच व्यावसायिकांची दुकाने पुढे व निवास पाठीमागे अशी पूर्वीपासून व्यवस्था आहे. मात्र मागचे लॉकडाऊन मध्ये या व्यवसायिकांनी दुकान पुढील बाजूने बंद मात्र मागच्या दाराने आत प्रवेश करून चालू असे प्रकार केले होते. त्यामुळे किराणा, कापड व्यावसायिकांचे हे ‘खुष्कीचे मार्ग’ आजही चालू होते. यावर लक्ष ठेवण्यासाठी कुठलीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

लॉकडाऊन काळात बाहेर गावाहून आलेल्यांची तपासणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना होत्या. तरीसुध्दा औरंगाबाद (गंगापूर) वरून आलेल्या त्या मृत इसमाची स्थानिक कमिटीकडे कुठलीही नोंद अगर माहिती नव्हती. तसेच त्याचे मुलाचे लग्न जेथे झाले त्याबाबतही माहिती समोर येऊ शकली नाही. त्यामुळे आता बंद झाले असले तरी येणार्‍या जाणार्‍या नागरिकांवर कोण लक्ष ठेवणार? असा सवाल एका वैद्यकीय जाणकाराने उपस्थित केला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com