पोटच्या मुलाचा खून करणार्‍या बापाला जन्मठेप

जिल्हा न्यायालयाचा निकाल
पोटच्या मुलाचा खून करणार्‍या बापाला जन्मठेप

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

पोटच्या मुलाचा खून करणार्‍या बापाला जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी भादंवि कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व पाच हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे. गोरख ऊर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय 45 रा. आखेगाव ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मुलगा सोमनाथ (वय 18) याचा खून केला होता. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन बी. पवार यांनी कामकाज पाहिले.

29 मार्च, 2021 रोजी फिर्यादी (मयत सोमनाथची आई) सायंकाळी सहा वाजता शेतातुन काम करून घरी आल्या होत्या. त्यावेळी मुलगा सोमनाथ व पती गोरख कर्पे हे दोघेच घरी होते. गोरख हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी फिर्यादी त्याला म्हणाल्या, आज होळीचा सण असून तुम्ही सणासुदीच्या दिवशी दारू का पिऊन आला?, असे विचारले असता गोरखला त्याचा राग आला. तो फिर्यादीला मारण्यासाठी पुढे आला असता मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने गोरखने त्याला शिवीगाळ केले व घरातुन निघुन गेला. त्यानंतर फिर्यादी व तिचा मुलगा सोमनाथ यांनी रात्री जेवण केले. ते दोघे रात्री 10 वाजता त्यांच्या आखेगाव शिवारातील शेतीतील ऊसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

मुलगा सोमनाथ हा ऊसाला पाणी देत होता व फिर्यादी ऊसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचल्यावर तसे त्याला आवाज देऊन सांगत होत्या. त्या दोघांच्या दरम्यान साधारण 100 फुटांचे अंतर होते. शेताला पाणी देत असताना पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मुलगा सोमनाथ याचा ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी त्याच्याकडे पळत गेल्या होत्या. तेव्हा फिर्यादीने तिचा पती गोरख कर्पे हा लोखंडी गजाने सोमनाथच्या डोक्यात मारत असताना पाहिले. त्यावेळी सोमनाथ हा गंभीर जखमी झालेला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते व तो काहीही बोलत नव्हता.

फिर्यादीस पाहून गोरख हा तेथुन निघुन गेला. त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी गज होता. सोमनाथचा आवाज ऐकुन शेजारच्या शेतात पाणी देत असलेली फिर्यादीची जाव मुक्ता कर्पे, आंबादास शिवाराम जाधव, सतिश काकासाहेब पायघन हे तेथे आले. त्यांनी सोमनाथ याला उपचारासाठी शेवगाव व नंतर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमनाथचा मृत्यु झाला होता.

सदर घटनेबाबत फिर्यादीने शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती गोरखविरोधात भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने एकुण 12 साक्षीदार तपासण्यात आले. सदरचा खटला हा जिल्हा न्यायालयात जलदगतीने चालविण्यात येऊन 1 वर्ष 22 दिवसात निकाल लागला. सरकारी वकील अर्जुन पवार यांनी केलेला युक्तिवाद, न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा ग्राह्यधरून न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यामध्ये पैरवी अधिकारी सहा. फौजदार महेश जोशी व शेवगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन खेडकर यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.