
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जावयासह त्याच्या आई व चुलतीला सासूरवाडीच्या 10 जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी व रविवारी सकाळी रेल्वे स्टेशन येथील जंगम वस्तीवर घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुमन सुरेश जंगम (वय 55 रा. जंगम वस्ती, रेल्वेस्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा गोविंद जंगम व जाऊ मिना बाबु जंगम यांना मारहाण केली आहे.
गोविंदची पत्नी रेखा गोविंद जंगम (रा. जंगम वस्ती, रेल्वेस्टेशन), सासु जनाबाई भाऊसाहेब पवार (रा. चाणक्य चौक, नगर), मेव्हणी जयश्री कैलास गायकवाड (रा. बुरूडगाव रोड, नगर), मंगल चंद्रकांत धोत्रे, शितल कचरू फुलारे (दोघे, रा. केडगाव), लखन भाऊसाहेब पवार, अनिता लक्ष्मण शिंदे, सुरेखा अजिनाथ पवार (तिघे रा. आनंदऋषी हॉस्पिटलजवळ, नगर), सुनीता अर्जुन गायकवाड (रा. पाईपलाइन रोड, सावेडी), रूपाली राजू पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गोविंद जंगम व त्यांची पत्नी रेखा जंगम यांच्यामध्ये वाद झाल्याने रेखा गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत आहे. शनिवारी सायंकाळी गोविंद हे घरी असताना पत्नी रेखा, सासू जनाबाई व मेव्हणी जयश्री तेथे आल्या. त्यांनी गोविंदला शिवीगाळ करून मारहाण केली. जनाबाईने लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची जाऊ मिना जंगम मध्ये आल्या असता त्यांना देखील मारहाण केली.
रविवारी सकाळी वरील 10 जणांनी फिर्यादी सुमन जंगम यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.