लोणीतील व्यापार्‍यासह चौघे करोना बाधित
सार्वमत

लोणीतील व्यापार्‍यासह चौघे करोना बाधित

37 जणांच्या स्त्राव तपासणी अहवालाची प्रतीक्षा

Nilesh Jadhav

लोणी | वार्ताहर | Loni

लोणी बुद्रुक येथील व्यापार्‍यासह चार जण शनिवारी करोना बाधित आढळून आल्याने लोणीकरांची चिंता पुन्हा वाढली आहे. बाधित व्यक्तींपैकी एक जण चार दिवसांपूर्वी पनवेल येथून लोणीत नातेवाईकांकडे आलेली होती. बाधितांच्या संपर्कातील 37 जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

लोणी बुद्रुक गावात दहा दिवसांपूर्वी आढळलेले चार जण उपचार घेऊन बरे झाले असतानाच शनिवारी गावातील सोनार गल्लीतील व्यापारी, त्यांची पत्नी आणि मुलगी करोना बाधित आढळून आली. प्रवरेच्या कोव्हिड सेंटरमध्ये त्यांच्या घशातील स्राव घेऊन तपासणी केली असता ते बाधित आढळून आले. त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे स्राव घेण्यात आले असून काहींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर इतरांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

लोणी येथील एका व्यक्तीचे नातेवाईक चार दिवसांपूर्वी पनवेल येथून लोणीत आले होते. शनिवारी त्यांना त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथे त्यांच्या घशातील स्रावाची तपासणी केली असता ती व्यक्ती बाधित आढळून आली. या दोन्ही ठिकाणच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 37 व्यक्तींच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल रविवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी लोणी बुद्रुक गावातील सोनार गल्ली, विठ्ठलप्रभा हाउसिंग सोसायटीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला असून 30 जुलैपर्यंत या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले. आज प्राप्त होणार्‍या प्रलंबित अहवालांकडे लोणीकरांचे लक्ष लागून आहे. लोणी गावातील इतर भागातील व्यवहार मात्र चालू ठेवण्यात आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com