कुकडी पाणीप्रश्नी तीन आठवड्यांत कायमस्वरूपी तोडगा काढू

शरद पवार यांचे श्रीगोंद्यात आश्वासन
कुकडी पाणीप्रश्नी तीन आठवड्यांत कायमस्वरूपी तोडगा काढू
शरद पवार

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्न सोडविण्यासंदर्भात नव्या पिढीने आग्रह धरला आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेऊन विस्तृत चर्चा केली आहे. येत्या काही दिवसांत तिसरी बैठक घेणार असून तीन आठवड्यांत कुकडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही पद्मविभूषण खा. शरद पवार यांनी दिली.

(स्व.) शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नागवडेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खा. पवार यांनी कुकडीच्या पाणीप्रश्नात लक्ष घालून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती नागवडे यांनी केली होती. हा धागा पकडत कुकडीच्या पाणीप्रश्नावर बोलताना खा. पवार म्हणाले, नगर जिल्ह्यातील कुकडीच्या पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आ. रोहित पवार यांच्यासह सर्वच नव्या पिढीने आग्रह धरला आहे. कुकडी पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी यापूर्वी जलसंपदा विभागाच्या दोन बैठका घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये या कुकडी प्रकल्प समूहातील अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर विस्तृत चर्चा झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत जलसंपदा विभागाची पुन्हा एकदा बैठक घेऊन तीन आठवड्यात या कुकडीच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार आहोत, अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी दिली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, कुकडी पाणीप्रश्न जटील आहे. या पाणीप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही खा. शरद पवार यांचे मार्गदर्शन घेत आहोत. त्यांच्या उपस्थितीत तब्बल दोन-दोन तासांच्या दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये अडचणी व उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली असून पुन्हा एकदा बैठक घेऊन मार्ग काढणार आहोत. या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवून या भागाला अधिकाधिक पाणी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, नगर जिल्ह्यातील कुकडी पाणीप्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. हा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्धार ना. जयंत पाटील यांनी केला आहे. पुणेकरांचे कसे करायचे आणि नगर जिल्ह्याला पाणी कसे द्यायचे हे ना. जयंत पाटील पाहतील, असे ना. थोरात यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com