एकल कलाकारांना मिळणार पाच हजार

अर्ज करण्याचे आव्हान || जिल्हास्तरीय समिती गठीत
एकल कलाकारांना मिळणार पाच हजार

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील विविध कलाक्षेत्रात काम करणार्‍या एकल कलाकारांनी शासनाच्या एक रकमी कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदत मिळण्यासाठी आपल्या तालुक्यातील तहसिलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी एकल कलाकार निवड समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

कोविडमुळे कलाकारांना दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातुन मिळणारे उत्पन्नापासून वंचित रहावे लागले होते. त्यामुळे कलाकार आर्थिक अडचणीत आले आहे. जिल्ह्यातील असंघटित व संघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनातर्फे आर्थिक मदत प्राप्त व्हावी. या उद्देशाने एक रकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने एकल कलाकारांना एकरकमी प्रति कलाकार पाच हजार रुपये याप्रमाणे आर्थिक मदत जाहिर केली आहे.

या बैठकीत जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त,नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, एनआयसीचे अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासह भगवान भागिनाथ राऊत, रियाज अहमद पठाण, डॉ. शाम वसंत शिंदे, हमीद अमीन अन्सारी, नंदकुमार ताराचंद खरात यांचा यामध्ये समावेश आहे.

Related Stories

No stories found.