सैनिकाची साडेआठ लाखांची फसवणूक

ऑनलाईन घातला गंडा || सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा
सैनिकाची साडेआठ लाखांची फसवणूक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील आर्मड कोअर सेंटरमध्ये नियुक्तीस असलेले सैनिक भोपेंदर सरीभलेराम सिंग (वय 42 मुळ रा. जिंद्राणकला, ता. जि. रोहतक, हरियाणा) यांची ऑनलाईन आठ लाख 46 हजार 358 रूपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. त्यांना विविध सात मोबाईल नंबरवरून फोन आले होते. 30 एप्रिल, 2022 ते 30 ऑगस्ट, 2022 दरम्यान ही घटना घडली असून सिंग यांनी 17 सप्टेंबर रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन येत होते. समोरचा व्यक्ती,‘मी इनकम टॅक्स डिपार्टमेंट (आयकर विभाग) मधून बोलतो’, असे भासवित होता. तो सिंग यांना वेळोवेळी फोन करून म्हणाला,‘तुमचे आयकर विभागाचे 12 लाख रूपये आमच्याकडे जमा झाले आहेत, ते तुम्हाला पाहिजे असल्यास जीएसटी भरावा लागेल’, असे बोलून त्या व्यक्तीने सिंग यांचा विश्‍वास संपादन केला.

वेळोवेळी सिंग यांच्याकडून त्या व्यक्तीने सात वेगवेगळ्या नंबरवरील फोन पे, गुगल पे वर एकुण आठ लाख 46 हजार 358 रूपये घेतले. आपली फसवणूक झाल्याचे सिंग यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com