सोहम उत्तम शेणकर हा विद्यार्थी उद्याचा अकोल्याचा संशोधक ?

सोहम उत्तम शेणकर हा विद्यार्थी उद्याचा अकोल्याचा संशोधक ?

अकोले |प्रतिनिधी| Akole

प्रखर बुद्धिमत्ता, प्रदूषणाची समस्या जाणणारी क्षमता आणि टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचे आत्मसात केलेले कौशल्य यामुळे सोहम उत्तम शेणकर हा सातवीत शिकणारा विद्यार्थी उद्याचा अकोल्याचा संशोधक म्हणून पुढे आला तर आश्चर्य वाटणार नाही! अशा प्रकारची परिस्थिती समोर आली आहे.

त्याने टाकाऊपासून टिकाऊ असे सूत्र डोळ्यापुढे ठेवले आणि बॅटरीच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक कार बनवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.

सोहम उत्तम शेणकर हा सातवीमध्ये शिकतो आहे.सध्या तो कोते पब्लिक स्कूलला 7 वीच्या वर्गामध्ये प्रथम क्रमांकाने चमकत आहे.

पण संशोधक म्हणून त्याची सुरुवातच मुळात चौथीपासून सुरू झाली. चौथीत शिकत असताना सोहमने त्याही वेळेस रिमोट कंट्रोल कार, रिमोट कंट्रोल ट्रॅक्टर बनवला होता आणि हायड्रॉलिक जेसीबी तयार करून विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये त्याने बक्षिसांची लयलूट केली होती.

आणि...त्यामुळेच आता ऑनलाईन शिक्षणाच्या काळामध्ये त्याने बनवलेली इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिकल कार सर्वांच्या कौतुकाला पात्र ठरली आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करावा की करू नये? अशा वादविवादाच्या मुद्द्यावर करोना काळात ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. तरीही या सोहम नावाच्या प्रखर बुद्धिमत्तेच्या मुलाने आपल्या मोबाईलचा वापर हा आपले कुतूहल शमवण्यासाठी केला. युट्यूब ला जाऊन वेगवेगळी दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने त्याने अभ्यासली. आणि आज तो अशा एका उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे की त्याला प्रदूषणाच्या समस्येने चिंतेत टाकले आहे.

आपल्या घरबांधणीच्या काळामध्ये घरामध्ये उरलेले पाईप, प्लायवूड, फिटिंग वायर या सगळ्या गोष्टी त्याने गोळा केल्या. विशेष बाब म्हणजे त्याने बॅटरी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, हॉर्न व अन्य काही वस्तू हे सर्व ऑनलाईन मागवले. आज त्याने आपल्या डोक्यातली इलेक्ट्रॉनिक- इलेक्ट्रिकल कार बनवून त्याने अकोले तालुक्यामध्ये कौतुकाचे केंद्र स्वतःकडे वळवले आहे.

अकोले नगरपंचायतचे प्रशासन विभाग अधिकारी उत्तम शेणकर हे त्याचे वडील. ते स्वतः औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तो वारसा सोहमकडे संक्रमित झाला. पर्यायाने मोबाईलच्यामध्ये आपले लक्ष केंद्रित करताना फक्त शैक्षणिक साधनांसाठी त्याने व्हिडीओ क्लिप्स पाहिल्या. आजोबा व अकोले सोसायटीचे माजी चेअरमन मुरलीधर, आजी सुमनबाई, आई योगीता, काकी कविता, काका राजेंद्र आणि बंधू विनीत या सर्वांना त्याने सारखे सतावीत हे का? हे कसे? याने काय होईल? असे प्रश्न चौथीपासून विचारीत त्यांना भंडावून टाकले. आपली कुतूहलाची व प्रश्नांची त्याने सोडवणूक करून घेऊन संशोधकीय वाटचालीचा श्रीगणेशा आखला आणि त्यातून यशस्वी झाला हे विशेष होय.

अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी संस्थेच्या औपचारिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या कार्यक्रम प्रसंगी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली. त्याला ड्रॉईंग बुक, कलर पेटी, त्याचे कौतुक करून व गुच्छ देऊन त्याचा सत्कार करून इतर मुलांनाही त्याचा आदर्श घेण्यासाठी आवाहन केले.

त्याला त्याच्या घरी जाऊन बोलते केल्यानंतर सोहमचे पुढील स्वप्न आर्किटेक्ट अथवा इंजिनिअर होण्याचे आहे.असे त्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. भविष्यामध्ये दिवाळीच्या काळामध्ये लोखंडी पत्र्याची कार बनवण्याचा त्याचा मानस आहे. शिवाय वृत्तपत्रीय वाचनावरून नवे हेलिकॉप्टर पाते निखळले व बनवणार्‍याच्या मानेवर पडून आणि बनवणारा मुलगा कसा मृत्युमुखी पडला याचीही त्याला माहिती आहे. हेही चकित करणारे असे होते. सोहमला भविष्यामध्ये खूप मोठे व्हायचे आहे. आणि हे करताना घरातल्या सर्वांनाही सौख्य, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे यासाठी कष्ट घ्यायचे आहेत. त्यासाठी त्याला त्याचे संशोधन चालू ठेवायचे आहे.त्याची स्वप्नपूर्ती हे अकोलेचे भविष्यात मोठे इप्सित साध्य झालेले असे त्याचे स्वप्न आहे. असे चर्चेतून स्पष्ट झाले. असे अनेक सोहम गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात व्हावे, अशी त्याची अपेक्षा ही थक्क करणारी होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com