
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक कणा असलेल्या 79 सेवा सोसायटीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत.
तालुक्यातील 84 सेवा सहकारी सोसायटी पैकी 79 सेवा सोसायटीच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या चार महिन्यात यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती सहायक निबंधक अधिकारी भारती काटुळे यांनी दिली.
श्रीमती काटुळे म्हणाल्या की या सर्वच संस्था या तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभासद आहेत.डिसेंबर 21 ते जुलै 22 या कालावधीत या सर्व निवडणूका पार पडल्या आहेत. 84 पैकी 81 सेवा सोसयट्या निवडणुकीस पात्र होत्या तर एक ठिकाणी प्रशासक असून एका सेवा संस्थेची निवडणूक घेण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. तालुका ग्रामोद्योग संघाच्या मतदार याद्या या कार्यालयास अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत.
ज्या 79 सेवासंस्थेच्या निवडणूका पार पडल्या त्यापैकी 49 सोसायटीमध्ये मतदान घेण्यात आले तर 30 सोसायटीच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या. या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी सुभाष कराळे,एकनाथ राठोड,योगेश नरसिंगपूरकर,देविदास पारधे, सुवर्णा थोरात यांनी परिश्रम घेतले असल्याचे काटुळे यांनी सांगितले.