
तिसगाव |वार्ताहर| Tisgav
तालुक्याचे लक्ष वेधून घेणार्या सहकार क्षेत्रात (स्व.) रामभाऊ शहाराम अकोलकर यांच्यामुळे मोठा नावलौकिक मिळालेल्या करंजी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गावातील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक सत्ताधार्यांसाठी अस्तित्वाची तर विरोधकांसाठी प्रतीष्ठेची बनली आहे.
कोट्यावधींची वार्षिक उलाढाल असणार्या करंजी सेवा संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाच्या श्री उत्तरेश्वर सहकार पॅनेलचे नेतृत्व सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी चेअरमन विजय अकोलकर, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, सुनील साखरे, सुभाष अकोलकर, करत आहेत तर विरोधी गटाच्या सहकार महर्षी रामभाऊ शहाराम अकोलकर शेतकरी विकास परिवर्तन मंडळाचे नेतृत्व प्रगतशील शेतकरी आबासाहेब अकोलकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष जालिंदर वामन, मार्केट कमिटीचे संचालक अशोकराव अकोलकर, माजी चेअरमन महादेव आकोलकर, कारभारी मुखेकर, गणेश अकोलकर, संभाजी अकोलकर करत आहेत.
संस्थेचे 765 सभासद असून दिनांक 22 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी भेटीगाठी घेऊन मतदाराशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ताधारी गटाकडून प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर दिला जात आहे. तर विरोधी गटाने मात्र सुप्त प्रचार करण्यावर अधिक भर देत उमेदवार ते मतदार असा थेट संपर्क साधण्यावर भर दिला आहे. सत्ताधारी गटाकडून संस्थेचा पारदर्शक कारभार, संस्थेचे वाढलेले भाग भांडवल, संस्थेचा वाढत चाललेला विस्तार या सकारात्मक विषयांकडे मतदारांचे लक्ष वेधले आहे. तर विरोधी गटाने केवळ एकदोन लोकांच्या हितासाठीच संस्थेचा वापर केला जात असून संस्थेत सहकार नव्हे, तर स्वाहाकार पद्धतीने कारभार केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत नविन चेहरे पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम सत्ताधारी गटाचे नेते मंडळी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकांना सत्तेची संधी द्या असे आवाहन माजी चेअरमन महादेव अकोलकर यांनी मतदारांना केले आहे. करंजी सेवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये छावणीचा विषय प्राधान्याने दोन्ही गटाकडून उपस्थित केला असून विरोधकांनी सुरू केलेल्या छावणीत भ्रष्टाचार झाला असा गंभीर आरोप सत्ताधारी गटाच्या पॅनलकडून केला आहे. तर विरोधी गटाच्या लोकांना छावणीची मंजुरी मिळू नये, म्हणून ज्यादा जनावर असताना देखील रेकॉर्डवर ते कमी दाखवून संस्थेचा पैसा वाया घातला इतक्या संकुचित मनाच्या लोकांना पुन्हा सत्तेची संधी देणार का ? संस्थेने चालवलेल्या छावणीत लाखो रुपयांचा नफा झाला तो कुठे आहे याचा सभासदांना हिशेब द्या, असे आव्हान विरोधकांनी सत्ताधार्यांना दिले आहे.