
गणोरे |वार्ताहर| Ganore
दि. 6 डिसेंबर रोजी गावातील एका विशिष्ट धर्मीय तरुणाने समाज माध्यमांमध्ये एक पोस्ट स्टेटसला ठेवून दोन धर्मियांमध्ये तणाव निर्माण होईल अशा प्रकारचे वर्तन केल्याने परिसरातील दुसर्या धर्माचे नागरिक प्रचंड आक्रमक झाले. धर्मामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या तरुणावरती तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. आरंभी समाज माध्यमातील ही पोस्ट वाचल्यानंतर काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता. दुसर्या धर्माचे तरुण आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव काहीसा शांत होण्यास मदत झाली.
सहा डिसेंबर रोजी गावातील एका तरुणाने दुसर्या धर्माच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना दुखावणारे स्टेटस ठेवले होते. हे स्टेटस समाज माध्यमात व्हायरल झाल्याने गावातील विशिष्ट धर्माचे लोक एकत्र आले. त्यांनी संबंधित तरुणांवरती कारवाईची मागणी केली. मात्र त्यापूर्वी गावात समाज माध्यमावरील पोस्टमुळे वातावरण प्रचंड तापले होते. संघर्षाचे चिन्हे दिसू लागली होती. तरुणांनी एकत्र येऊन कारवाईची मागणी केली होती मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव कमी झाला.
दुसर्या दिवशी संबंधित तरुणाच्या भूमिकेच्या विरोधात गावातील सर्व लोक एकत्रित येऊन संपूर्ण गावातील व्यवहार बंद करण्यात आले. गावातील सर्वांनीच या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला.त्यानंतर नागरिकांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत नागरिकांनी आपल्या भावना अत्यंत संतप्त स्वरूपात व्यक्त केल्या. या तरुणाने दुसर्या धर्माबद्दल द्वैष पसरवणारे विधाने यापूर्वी समाज माध्यमात केलेले होते.
यापूर्वी मात्र नागरिकांनी गंभीरपणे दखल घेतली नाही. त्याचे वाढते प्रकार लक्षात घेऊन नागरिकांनी यावेळेस त्याला धडा शिकवावा अशी विनंती प्रशासनाला केली आहे. संबंधित तरुणाचे वडिलांचा गावात व्यवसाय असून संबंधित व्यवसायाच्या गाळ्यांना ग्रामसभेने एकत्र येऊन कुलूप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे गावात त्यांचे सुरू असणारे बांधकाम देखील बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढे त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या नाहीत, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.