पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र

मुख्यमंत्री शिंदे || नगरच्या सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन
मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री शिंदे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शाहू-फुले-आंबेडकरांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांनी एकत्रित काम केल्यास योजना प्रभावीपणे राबिल्या जातात. उपेक्षित घटकांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन महत्वाचे ठरेल. त्याच बरोबर जात पडताळणी प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्राची प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सावेडीत उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते. खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, महापौर रोहिणी शेंडगे, आ. संग्राम जगताप, आ. राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, उपमहापौर गणेश शेळके, सुवेंद्र गांधी, अशोक गायकवाड, सुनील क्षेत्रे, सुनील उमाप आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामाजिक न्याय विभागासाठी 20 ते 22 हजार कोटी रूपयांची तरतूद केली जात आहे. विविध महामंडळांच्या माध्यमातून रोजगार प्रशिक्षण, व्यावसायासाठी कर्ज, माध्यमिक, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, घरकुले अशा सर्वांगीण विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. जगाच्या स्पर्धेत विद्यार्थी मागे राहणार नाहीत. यादृष्टीने सेवा-सुविधा उच्च दर्जाच्या दिल्या जात आहेत. राज्यातील सरकार हे जनतेचे आहे. जनतेला पाहिजे असलेल्या सुविधा दिल्या जाणार आहेत. राज्यातील 36 पैकी 31 जिल्ह्यात सामाजिक न्याय भवनांची उभारणी झाली आहे. त्यामाध्यमातून सर्व योजना एकात छताखाली दिल्या जाणार आहेत. त्यातून खर्‍या उपेक्षितांपर्यंत योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

मंत्री विखे म्हणाले, नगर शहाराच्या विकासात या भवनामुळे ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्याच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन व्हावे, अशी जनतेची मागणी होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. जनतेची मागणी खर्‍या अर्थाने पूर्ण होत आहे. अमोल बागूल यांनी सूत्रसंचालन केले. नाशिक विभागाचे उपायुक्त भगवान वीर यांनी आभार मानले.

उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा सन्मान

सामाजिक न्याय भवनाची उभारणी करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडणारे अधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाच्या अधिकार्‍यांना ही सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com