आमदारांच्या दुर्लक्षामुळे पाटपाण्यांसह सल्लागार समितीचा खेळखंडोबा

रब्बी पिकांची राखरांगोळी - स्नेहलता कोल्हे
आमदारांच्या दुर्लक्षामुळे पाटपाण्यांसह सल्लागार समितीचा खेळखंडोबा
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

चालू हंगामात पर्जन्यमान चांगले झाले. दारणा, गंगापूर व अन्य धरणे शंभर टक्के भरली. पण आमदारांच्या दुर्लक्षामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी हक्काच्या पाटपाण्यांच्या रब्बी आर्वतनापासून वंचित राहिला आहे. कालवा सल्लागार समितीची साधी बैठकही ते घेवु शकत नाही हे दुदैव असून नाशिक पाटबंधारे खात्याच्या ढीसाळ कारभारावर महाविकास आघाडी शासनाचा व आमदारांचा वचक राहिला नाही. रब्बी पिक हंगामाची सुरुवात होत असतानाच राखरांगोळी होवुन शेतकरी हवालदिल झाला आहे. तेव्हा जलसंपदा मंत्र्यांनी तात्काळ गोदावरी कालवे सल्लागार समितीची बैठक घेवून त्यात रब्बी व उन्हाळ हंगामाचे नियोजन करून तातडीने रब्बी पिकांना पाणी सोडावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

सौ. कोल्हे म्हणाल्या, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यकाळात गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांचे कधीही नुकसान होवु दिलेले नाही. मात्र गेल्या दोन वर्षापासून उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग व नाशिक पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे गोदावरी कालवे लाभधारक. शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चालू हंगामात उशीराने झालेले पर्जन्यमान, कधी अतिवृष्टी यामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. सोयाबीन, मका, बाजरी, कापूस पिके शेतातच वाया गेली, महाविकास आघाडी शाासनाने त्यांच्या नुकसान भरपाईची फक्त मखलाशी केली.

पण प्रत्यक्षात असंख्य शेतकर्‍यांच्या खात्यात भरपाईची रक्कमच दिली नाही. खरीपाचे नुकसान रब्बी पिकात भरून काढु अशी शेतकर्‍यांना आशा होती. पण ती देखील मावळली आहे. धरणे पाण्याने तुडूंब भरलेली आहेत. लोकप्रतिनिधी खुशाल झोपेचे सोंग घेत तुपाशी आहे. मात्र शेतकरी उपाशी आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई ऐवजी लाभक्षेत्रात घेण्याबाबत त्यांनी समाजमाध्यमांवर मोठया फुशारक्या मारल्या. कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे त्याबाबत बडेजाव केला. पण चालु रब्बी व उन्हाळ हंगामाचे नियोजन ठरविण्यात व कालवे सल्लागार समितीची बैठक घेण्यात लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा सर्वच शेतकर्‍यांना चांगलाच भोवला आहे. तर दुसरीकडे विहिरींना पाणी असतानाही वीज रोहित्रचा वीज पुरवठा खंडित करून शेतकर्‍यांकडून सुलतानी वीज बिलांची वसुली सुरू आहे.

अशा दुहेरी संकटात गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी सापडला आहे. महा विकास आघाडीचे शासन तसेच लोकप्रतिनिधी शेतकर्‍यांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखवत असुन शेतकर्‍याच्या रब्बी हंगाम सुरू होण्याआधीच त्या पिकांची तसेच बारमाही पिकांची राखरांगोळी झाली आहे. तातडीने गोदावरी कालव्याचे पाण्याचे आवर्तन सोडावे आवर्तनाच्या तारखा निश्चित कराव्या अशी मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com