कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

दिवसेंदिवस रुग्णांची आकडेवारी कमी झालेली असली तरी करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही.

सर्वांनी आपले व आपल्या कुटुंबियांची काळजी घेणे गरजेचे आहे. करोना आटोक्यात आल्याचे चित्र भासवत शासनाने जनतेसाठी मोफत सुरु केलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केल्याने अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून बंद केलेले डेडिकेटेड कोविड सेंटर त्वरित सुरु करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

करोनाचा हाहाकार हा गेल्या वर्षापासुन जगभरात सुरु आहेत. या विषाणूविषयी अनेक अफवांमुळे अनेकांच्या मनात भितीचे वातावरण आजही निर्माण झाल्यामुळे नेमके आपल्यासमोर संकट उभे राहिले तर करायचे तरी काय? याबाबत अजूनही नागरिक संभ्रमात आहे. त्यात या राज्य सरकारने येत असलेले संकटाचे नियोजन, उपाययोजना, वेळेतच सुविधा तातडीने उभे केले असते तर नक्कीच जनतेची गैरसोय झाली नसती.

कोपरगांव तालुक्यातील सुविधा, उपचार, तपासणी बंद केल्याने अनेक नागरिक या जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात उपचारासाठी जात असल्याचे आजही निदर्शनास येत आहे. भविष्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास नागरिक आक्रमक भुमिका घेतील. यात कोणी कठोर पावले उचलू नये यासाठी बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा सुरु करुन एकाच छताखाली उपचार व तपासणी सुरु करावी जेणे करुन नागरिकांची गैरसोय होणार नाही.

देशभरात लस सुरु झालेली असली तरी अद्याप ती घराघरात गेलेली नाही. त्यात काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. दुसर्या टप्यातील लाट ही जीवघेणा राहील. करोना रुग्णांची संख्या कमी झाली संकट अद्यापही कमी झालेेले नसताना देखील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी असलेले डेडिकेटड कोविड सेंटर बंद केल्याचे जाहीर झाल्याने अनेकांची तपासणीपासून ते उपचारापर्यंत सर्वच गैरसोय होत आहे.

सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची मोफत तपासणी होत होती परंतु आता याच तपासणीला नागरिकांना खासगी ठिकाणी पैसे माजावे लागत आहे. नागरीकांची गैरसोय व समस्या सोडविण्यासाठी बंद केलेले डेडिकेटड कोविड सेंटर सुरु करणे तातडीने गरजेचे असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.