रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेशा उपाययोजना करा

स्नेहलता कोल्हे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुरेशा उपाययोजना करा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने लढत आहे मात्र पुरेशा साधनसामुग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत.

त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णवाढ रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे केली आहे.

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे करोना आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांचेसह पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सौ.कोल्हे म्हणाल्या, तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून संसर्ग झालेल्या रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.

नातेवाईकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्यावतीने ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु यासाठी लागणारी साधन सामुग्री, सोयी-सुविधा अपुर्‍या पडत असल्याने रुग्णांना सेवा देण्यास अडथळे येत आहेत. त्याकरिता तालुक्यात व्हेंटीलेटर बेडची संख्या वाढविण्यात यावी. कठउढ चाचणी करण्यासाठी केवळ एकच खाजगी लॅब उपलब्ध असल्याने कठउढ मशीनची उपलब्धता करून द्यावी.

त्याचप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन, रुग्णांना लागणारा ऑक्सिजन याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे यासाठी तात्काळ उपयायोजना कराव्यात. अँटीजेन चाचणीची वेळ वाढवावी,कठउढ चाचणी कमी दरामध्ये उपलब्ध करून द्यावी. मतदार संघासाठी कार्डीयाक अ‍ॅम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी. त्याचप्रमाणे संशयित रुग्णांना विलगीकरण कक्ष नसल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी गाव तेथे विलगीकरण कक्ष सुरू करावे. त्यावर स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण असावे.

शिर्डी येथे सुरू असलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये कोपरगाव तालुक्यातील रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी तेथील प्रशासनाला सूचना कराव्यात. अशा विविध मागण्या सौ. कोल्हे यांनी मांडल्या. ना. मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचीत करून या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा असे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com